कांदामार्केट परिसरातील प्रकार
बेळगाव : बेळगाव शहराचे मुख्य भाजीमार्केट समजल्या जाणाऱ्या कांदामार्केट परिसरात खराब भाजीपाला व दुर्गंधीमुळे दुरवस्था झाली आहे. खराब झालेला भाजीपाला रस्त्यामध्येच टाकला जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भाजीमार्केटची स्वच्छता करावी व रस्त्यामध्ये भाजी टाकण्यास मनाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. बेळगावमधील नागरिक भाजी खरेदीसाठी कांदामार्केट, महात्मा फुले भाजीमार्केट परिसरात येतात. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरू लागले आहे. खराब झालेला भाजीपाला रस्त्यामध्येच टाकल्याने दुर्गंधी व रोगराई दिवसेंदिवस वाढत आहे. खराब झालेल्या भाजीवर बसलेली कीड व रोगजंतू चांगल्या भाजीवरही येत असल्याने भाजीमार्केटमध्ये तरी स्वच्छता ठेवावी, अशी मागणी होत आहे. काही भाजी विक्रेत्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असून हे प्रकार बंद करणे गरजेचे आहे.
भाजी खाण्यासाठी मोकाट जनावरांची झुंबड
चिखलात पडलेली भाजी धुवून पुन्हा विक्री केली जाते. तसेच रस्त्यावर टाकलेली भाजी खाण्यासाठी मोकाट जनावरांची झुंबड सुरू असते. नागरिकांना भाजी खरेदी करताना या मोकाट जनावरांचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे भाजीमार्केटमध्ये स्वच्छता ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.









