शहरातील अनेक बसस्थानकांत मूलभूत सुविधाच नाहीत : महिलांना मोफत बसप्रवासाचा लाभ मिळत असला तरी बसस्टॉपवर खुर्च्यांअभावी ताटकळत थांबण्याची वेळ
बेळगाव : शक्ती योजनेमुळे राज्य सरकारने महिलांना मोफत बसप्रवासाची संधी उपलब्ध करून दिली. प्रवास जरी मोफत झाला असला तरी प्रवाशांच्या समस्या काही कमी झालेल्या नाहीत. शहरातील बऱ्याच बसथांब्यांवर निवारा शेड नाहीत. तर जेथे शेड आहेत ती मोडकळीस आली आहेत. काही ठिकाणच्या खुर्च्या चोरीला गेल्या असून काही ठिकाणी खुर्च्यांना दगडांचा आधार देण्यात आला आहे. त्यामुळे बस पकडण्यासाठी महिला तसेच शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर थांबून बसची वाट पाहण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्याला सुरुवात झाली असून पावसाच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी बसथांब्यांवर शेडची नितांत गरज आहे. मात्र, प्रवाशांना ऊन-पावसात डोक्यावर निवारा नसताना बसची वाट पाहावी लागत आहे. शहरातील पहिले रेल्वेगेट, दुसरे रेल्वेगेट, गोगटे सर्कल, उद्यमबाग, चंदगड बसस्टॉप, राकसकोप बसस्टॉप, जिजामाता चौक येथील बसथांबा यातील काही ठिकाणी शेड उपलब्ध आहेत. परंतु, ते केव्हा कोसळतील, याची शाश्वती नाही. काही ठिकाणी शेडच नसल्याने धोका पत्करून प्रवासी रस्त्यावर थांबतात. त्यामुळे शहरात बसथांब्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.









