टेनिस कोर्टवरील गवताचे कबुतरांकडून नुकसान होऊ नये यासाठी बहिरी ससाण्याकडे जबाबदारी
वृत्तसंस्था/ लंडन
जगातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित विम्बल्डन टेनिस स्पर्धेला 3 जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरुवात होत आहे. तब्बल 146 वर्षे जुन्या असलेल्या या ग्रँड स्लॅमचा यंदाचा 136 वा हंगाम असेल. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठीही खास तयारी केली जाते. टेनिस कोर्टच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि सुरक्षारक्षक तैनात करण्याव्यतिरिक्त आकाशात उडणाऱ्या कबुतर आणि इतर पक्षांपासून टेनिस कोर्टला वाचवण्यासाठी विशेष तयारी केली जाते. यासाठी एका बहिरी ससाण्याला तैनात केले जाते. हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण हे खरे आहे. मागील पंधरा वर्षापासून रुफस नावाचा बहिरी ससाणा ही सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहे.
गवताच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत कबुतरांपासून कोर्टला वाचवण्यासाठी रूफस नावाचा ससाणा आहे. हॅरिस प्रजातीच्या या ससाण्यावर हे काम सोपवलेले असते. हा ससाणा ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटना व क्रॉकेट क्लब यांनी पाळला आहे. रूफसला विम्बल्डन स्पर्धेच्या आयोजनाचा महत्त्वाचा सदस्य मानले जाते. रुफसपूर्वी 2000 ते 2003 यादरम्यान हे काम हमीश नावाचा ससाणा करत असे. रुफसला विम्बल्डन कोर्टची सुरक्षा करताना आता जवळपास 15 वर्षे झाली आहेत. रूफस सामन्यादरम्यान सातत्याने हवेत उडत असतो आणि कबुतरांना कोर्टच्या जवळपासही येऊ देत नाही. विम्बल्डन टेनिस स्पर्धेसाठी मापात छाटणी झालेल्या गवतांची नासधूस या कबुतरांकडून होऊ नये, तसेच सामन्यादरम्यान त्यांच्यामुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, याची खबरदारी हा ससाणा घेत असतो.

रुफसचे कामकाज व सुरक्षेची जबाबदारी
साधारण अर्धा किलो वजनाचा रुफस हा ऑल इंग्लंड क्लबच्या सेवेत आला तो अवघ्या 16 आठवड्यांचा असताना. तेव्हापासून त्याला ट्रेनिंग दिले गेले. कोणत्याही पक्षाला असे ट्रेनिंग देऊन काम करुन घेणे सोपे नसते पण रुफस हा शांत, निर्धास्त स्वभावाचा आहे. त्याचे काम तो चोख बजावतो. विम्बल्डनच्या कोर्टची जबाबदारी पाळत असताना सकाळी पाच वाजता कामकाजाला सुरुवात होते. यावेळी टेनिस कोर्टचे कर्मचारी मशागत करत असतात यावेळी रुफस संकुलात फिरुन कबुतरांना पळवून लावतो. त्यानंतर टेनिसपटूंच्या येण्याजाण्याला सुरुवात होते, असे रुफसची ट्रेनर इमॉगन डेव्हिस यांनी सांगितले. लंडन शहर परिसरासह अनेक ठिकाणी कबुतरांचा मोठा वावर आहे. विम्बल्डन कोर्टवर लावण्यात येणाऱ्या कोवळ्या गवतांना तसेच त्यांच्या बिया खाणे म्हणजे कबुतरांना पर्वणी वाटते. ते मोठ्या संख्येने हे गवत खाण्यासाठी येतात. टेनिस संकुलातील कबुतरांच्या वावराला रुफसने मर्यादा घातली आहे. अर्थात, मागील काही वर्षात जगभरात तंत्रज्ञानामध्ये मोठा बदल झाला आहे. सुरक्षा व्यवस्थेत मोठी साधने आली आहेत तरीही ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटनेने रुफस या बहिरी ससाण्यावर विश्वास कायम ठेवला आहे.
रुफसवर एक नजर –
- कबुतरांवर वचक व नजर ठेवण्यासाठी ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटनेकडून नेमणुक.
- मागील 15 वर्षापासून ऑल इंग्लंड क्लबच्या सेवेत.
- टेनिस संकुलात फिरणाऱ्या कबुतरांना पळवून लावणे, हे मुख्य काम
- चिकन, क्वेल (कवड्यासारखा पक्षी), ससे आणि कबुतरे असा रुफसचा आहार आहे.
- ट्रेनर इमॉगन डेव्हिसच्या मार्गदर्शनाखाली लंडनसह परिसरातील नॉर्थहॅम्पटन, सेंटर क्लब, हॅम्पाशायर परिसरात वर्षभरासाठी देखभालीसाठी नेमणूक केली आहे.









