अॅशेस मालिकेत कांगारुंची 2-0 अशी आघाडी कर्णधार स्टोक्सचे झुंजार दीडशतक, डकेटचे अर्धशतक वाया
लॉर्डस्च्या मैदानावर रविवारी कर्णधार स्टोक्सने कप्तानी खेळी करत नोंदविलेले झुंजार दीडशतक (155) अखेर वाया गेले. ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत खेळाच्या शेवटच्या दिवशी चहापानाच्या कालावधीत यजमान इंग्लंडचा 43 धावांनी पराभव करत या मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने चुरशीचे झाले. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला सामनावीराचा बहुमान मिळाला.
या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 416 धावा जमविल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 325 धावा जमविल्याने ऑस्ट्रेलियाने 91 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 279 धावा जमवित इंग्लंडला निर्णायक विजयासाठी 371 धावांचे आव्हान दिले होते. या कसोटीतील शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी इंग्लंडची स्थिती 4 बाद 114 अशी केविलवाणी असल्याने ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजय सहज मिळविणे शक्य होईल असे वाटत होते. पण कर्णधार बेन स्टोक्स आणि डकेट या जोडीने आपल्या संघाचा संभाव्य पराभव लांबविला. कर्णधार स्टोक्सने ऑस्ट्रेलियाच्या अचूक गोलंदाजीसमोर आक्रमक फटकेबाजीचा मंत्र वापरल्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर थोडे दडपण आल्याचे जाणवले. पण स्टोक्स 7 व्या गड्याच्या रुपात बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजय मिळविणे फारसे कठीण गेले नाही. स्टोक्स बाद झाला त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 70 धावांची गरज होती. पण इंग्लंडच्या शेवटच्या 3 फलंदाजांना केवळ 26 धावांची भर घालता आली.

डकेट-स्टोक्सची शतकी भागीदारी
इंग्लंडचे 4 फलंदाज केवळ 45 धावात बाद झाले होते. पण त्यानंतर डकेट आणि स्टोक्स यांनी संघाचा डाव चांगलाच सावरला. इंग्लंडने 4 बाद 114 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरुवात केली. स्टोक्स आणि डकेट या जोडीने 5 व्या गड्यासाठीची शतकी भागिदारी 157 चेंडूत नोंदविली. त्यामध्ये डकेटचा वाटा 51 तर स्टोक्सचा वाटा 46 धावांचा होता. इंग्लंडचे दीडशतक 40 षटकात नोंदविले गेले. दरम्यान स्टोक्सने सुरुवातीपासूनच आक्रमक फटकेबाजीवर भर देत आपले अर्धशतक 99 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने झळकाविले. इंग्लंडच्या 200 धावा 53.2 षटकात फलकावर लागल्या. उपाहारापूर्वीच स्टोक्सने आपले शतक 142 चेंडूत झळकाविताना 4 षटकार आणि 8 चौकार मारले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या हॅझलवूडने डकेटला कॅरेकरवी झेलबाद केले. त्याने 112 चेंडूत 9 चौकारांसह 83 धावा जमविताना स्टोक्ससमवेत पाचव्या गड्यासाठी 132 धावांची भागिदारी केली. डकेट बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक आणि फलंदाज बेअरस्टोने स्टोक्सला बऱ्यापैकी साथ दिली. ऑस्ट्रेलियाच्या ग्रीनने बेअरस्टोला यष्टीरक्षक कॅरेकरवी यष्टीचीत केले. त्याने 2 चौकारांसह 10 धावा केल्या. स्टोक्सला ब्रॉडने बऱ्यापैकी साथ दिली. या जोडीने उपाहारापर्यंत 7 व्या गड्यासाठी अभेद्य अर्धशतकी भागिदारी 29 चेंडूत नोंदविली. उपाहारावेळी इंग्लंडची स्थिती 57 षटकात 6 बाद 243 अशी होती. स्टोक्स 108 तर ब्रॉड एका धावेवर खेळत होते.

उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रात स्टोक्सने आपल्याकडे फलंदाजी अधिकवेळ राखण्याचा प्रयत्न केला. ब्रॉडने त्याला चांगली साथ दिली. या जोडीने 7 व्या गड्यासाठी शतकी भागिदारी 93 चेंडूत नोंदविली. स्टोक्सने आपले दीडशतक 197 चेंडूत 9 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने झळकाविले. इंग्लंडच्या 300 धावा 71.3 षटकात फलकावर लागल्या. यानंतर हॅझलवूडने स्टोक्सला कॅरेकरवी झेलबाद केले. हॅझलवूडच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात स्टोक्स झेलबाद झाला. त्याने 214 चेंडूत 9 षटकार आणि 9 चौकारांसह 155 धावा झळकाविल्या. यानंतर कमिन्सने रॉबिन्सनला एका धावेवर झेलबाद केले. हॅझलवूडने ब्रॉडला ग्रीनकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 36 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. टंग आणि अँडरसन यांनी शेवटच्या गड्यासाठी 25 धावांची भर घातली. दरम्यान, स्टार्कच्या गोलंदाजीवर टंगचा त्रिफळा उडाला. त्याने 26 चेंडूत 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. इंग्लंडचा दुसरा डाव 81.3 षटकात 327 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क, कमिन्स आणि हॅझलवूड यांनी प्रत्येकी 3 तर ग्रीनने 1 गडी बाद केला. या सामन्यात रविवारी पंचांनी उपाहारानंतरचे खेळाचे सत्र लांबविले. हा सामना चहापानापूर्वी संपेल असे वाटत होते.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया प. डाव 100.4 षटकात सर्व बाद 416, इंग्लंड प. डाव 76.2 षटकात सर्व बाद 325, ऑस्ट्रेलिया दु. डाव 101.5 षटकात सर्व बाद 279, इंग्लंड दु. डाव 81.3 षटकात सर्व बाद 327 (स्टोक्स 155, डकेट 83, रुट 18, बेअरस्टो 10, ब्रॉड 11, टंग 19, अवांतर 17, स्टार्क 3-79, कमिन्स 3-69, हॅझलवूड 3-80, ग्रीन 1-73).









