पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण
वृत्तसंस्था/ कोची
इस्रोच्या मिशन गगनयानची पूर्वतयारी सध्या जोरात सुरू आहे. मिशन गगनयानच्या क्रू रिकव्हरी टीमच्या पहिल्या तुकडीने कोची येथील भारतीय नौदलाच्या वॉटर सर्व्हायव्हल टेनिंग पॅसिलिटी (डब्ल्यूएसटीएफ) येथे प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केला. भारतीय नौदलातील पाणबुडे आणि सागरी कमांडोच्या पथकाने विविध बाबींची प्रात्यक्षिके पूर्ण केली. ‘डब्ल्यूएसटीएफ’मधील प्रशिक्षित तुकडी आता येत्या काही महिन्यांत इस्रोद्वारे नियोजित चाचणी प्रक्षेपणांच्या मोहिमेमध्ये सहभागी होईल.
भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम ‘गगनयान’ ऑगस्टच्या अखेरीस प्रक्षेपित केली जाईल, तर मानवरहित मिशन पुढील वषी प्रक्षेपित होईल, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी अलीकडेच दिली होती. गगनयान मोहिमेसाठी श्रीहरिकोटामध्ये आम्ही एक नवीन रॉकेट तयार केल्याचे त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) येथे एका कार्यक्रमावेळी सांगितले होते. या प्रणालीतील क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टमच्या एकत्रीकरणावर काम सुरू आहे. गगनयान मोहिमेत क्रू मेंबर्सची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.









