70 टक्के काम पूर्ण : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-म्यानमार-थायलंडदरम्यान जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. भारत, म्यानमार आणि थायलंड सुमारे 1,400 किमी लांबीच्या महामार्गावर काम करत आहेत. या महामार्गाच्या पूर्णत्वामुळे आग्नेय आशियाशी जोडलेल्या देशांमधील व्यापार, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.
हा महामार्ग मणिपूरमधील मोरेहला म्यानमारमार्गे थायलंडमधील मॅई सॉट येथे पोहोचणार असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांनी सांगितले. सध्या या प्रकल्पाचे सुमारे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, या महामार्ग कामाच्या अंतिम मुदतीबाबत मंत्र्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. हा त्रिदेशीय महामार्ग कोलकाता येथून सुरू होऊन उत्तरेकडील सिलीगुडीपर्यंत जाईल. येथून श्रीरामपूर सीमेवरून कूचबिहारमार्गे आसाममध्ये प्रवेश करेल. त्यानंतर दिमापूरहून नागालँडमध्ये प्रवेश करेल आणि मणिपूरमधील इंफाळजवळील मोरेहहून म्यानमारमध्ये प्रवेश करणार आहे. म्यानमारमधील मंडाले, नेपीडॉ, बागो, यंगून आणि म्यावा•ाr या शहरांमधून तो शेवटी मॅई सॉट मार्गे थायलंडमध्ये प्रवेश करेल. भारत-थायलंड-म्यानमार महामार्ग देशाला जमिनीद्वारे दक्षिण-पूर्व आशियाशी जोडेल आणि तीन देशांमधील व्यापार, आरोग्य, शिक्षण आणि पर्यटन संबंधांना चालना देईल, असा दावा केला जात आहे.









