‘गझवा-ए-हिंद’ दहशतवादी मॉड्यूल प्रकरणी एनआयएची शोधमोहीम
वृत्तसंस्था / लखनौ, पाटणा
राष्ट्रीय तपास संस्थेने रविवारी ‘गझवा-ए-हिंद’ या कट्टरपंथी मॉड्यूलच्या संबंधात बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशमधील पाच ठिकाणी छापे टाकले. एजन्सीने बिहारमधील दरभंगा येथे एका ठिकाणी, पाटण्यात दोन, सुरतमध्ये एक आणि बरेलीमध्ये एका ठिकाणी शोध घेतला. तीन राज्यात या संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. छाप्यांदरम्यान डिजिटल उपकरणे, मोबाईल फोन, मेमरी कार्ड, सिम कार्ड आणि कागदपत्रांसह गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आल्याचे एनआयएने सांगितले.
पाटणा जिल्ह्यातील फुलवारीशरीफ भागातील मरघुब अहमद दानिश उर्फ ताहिर याला बिहार पोलिसांनी गेल्यावषी 14 जुलै रोजी अटक केल्यानंतर ‘गझवा-ए-हिंद’चे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात 6 जानेवारी रोजी भारतीय दंड संहिता आणि बेकायदेशीर क्रियाकलाप कायदा, 1967 च्या विविध कलमांखाली मरघुब दानिशवर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर एनआयनेही याचा तपास सुरू केला होता. मरघुब दानिश हा गझवा-ए-हिंद मॉड्यूलचा सदस्य असल्याचे आढळून आले होते. तसेच त्याने दहशतवादी कारवाया करण्यासाठी देशात स्लीपर सेल स्थापन करण्याच्या उद्देशाने अनेक भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी आणि इतरांची भरती केली होती. त्या अनुषंगाने सध्या विविध धागेदोरे तपासण्यासाठी एनआयएने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.
पाटणा, दरभंगा येथे पहाटेपासून कारवाई
रविवार, 2 जुलै रोजी पहाटे 5 वाजता एनआयए आणि एटीएसची टीम एकत्र बिहारच्या दोन मोठ्या शहरात राजधानी पाटणा आणि दरभंगा येथे छापे टाकण्यासाठी पोहोचली. एनआयएच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी या दोन्ही ठिकाणी छापे टाकले. छापेमारीची माहिती मिळताच पाटणा आणि दरभंगामध्ये खळबळ उडाली. एनआयएच्या पथकाने पाटणातील फुलवारी शरीफ येथील इदारन-ए-शरियाजवळील पुस्तकांच्या दुकानावर छापा टाकला. दुसरीकडे दरभंगा जिह्यातील बेहेरा पोलीस स्टेशन परिसरात दुसऱ्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात एका संशयित तऊणाला ताब्यात घेण्यात आले. मात्र, चौकशीअंती त्याची सुटका केल्याचे समजते.
पाटण्यात एनआयएने एटीएस आणि पाटणा पोलिसांच्या सहकार्याने छापे टाकले. फुलवारी शरीफ इमारतीसमोरील पुस्तकांच्या स्टॉलवर छापा टाकण्यात आला. मोहम्मद रियाजुद्दीन कासमी असे छापा टाकण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रियाजुद्दीन हा तेथील एका पुस्तकाच्या दुकानाचा मालक आहे. रियाजुद्दीन केवळ पुस्तके विकण्याचे काम करतो, असा स्थानिकांचा दावा होता. मात्र, एनआयएकडून त्याच्या दुकानात शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली होती.









