ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीच्या 54 पैकी 30 आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. हा राजकीय भूकंप नाही. या गोष्टी घडणारच होत्या. डबल इंजिनच्या सरकारमधील एक इंजिन बंद पडण्याच्या मार्गावर होतं. म्हणून तिसरं इंजिन जोडलं. शिंदे फार काळ मुख्यमंत्री राहणार नाहीत, त्यांचे 16 आमदारही अपात्र ठरणार आहेत. आजच्या शपथविधीने हे अधिक स्पष्ट झालं. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळेल, असे असे सूचक विधान खा. संजय राऊत यांनी केले.
आजच्या राजकीय घडामोडींवर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राज्याच्या राजकारणात कोणताही भूकंप झाला नाही. ज्यांना तुरुंगात पाठवायचं, त्यांना भाजपने मंत्री केलं. हे सगळं होणारचं होतं. यासंदर्भात आमच्याकडे पक्की माहिती होती. आत्ताच्या सरकारकडे आमदारांचा आकडा असतानाही त्यांना अजित पवारांची गरज लागते. यावरुन एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाणार असून, त्यांचे 16 आमदारही अपात्र ठरणार आहेत, हे स्पष्ट होते.
दरम्यान, या नव्या समीकरणाला लोकांचा अजिबात पाठिंबा नाही. शपथविधीला मुख्यमंत्र्यांसह त्यांचे जे आमदार गेले, त्यांचे चेहरे पाहा. काय वेदना होत आहेत, ते समजेल, असेही राऊत म्हणाले.