महासैनिक दरबारमध्ये आयोजन : बी. टी. पाटील यांची माहिती : सर्व माजी सैनिकांसह हुतात्मा सैनिकांच्या वारसांना सहभागाचे आवाहन
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक आणि हुतात्मा सैनिकांच्या वारसांचा मेळावा येत्या गुरूवारी 6 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. शहरातील महासैनिक दरबारमध्ये दुपारी दोन वाजता या मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल राहुल माने यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे तहसिलदार उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजक माजी सैनिक बी. टी. पाटील (हिटणी, ता. गडहिंग्लज) यांनी दिली.
जिल्ह्यात सैन्यदल, नौसेना आणि वायूदल या तिन्ही दलातील माजी सैनिक आहेत. तसेच हुतात्मा सैनिकांचे वारस, नातेवाईकही आहेत. या सर्वांच्या समस्या, प्रश्न सोडविण्याबरोबरच त्यांच्यासाठी असणाऱ्या शासकीय योजना, उपक्रम याविषयी या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच माजी सैनिक आणि हुतात्मा सैनिकांच्या वारसांनाही त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्यापुढे असणारे प्रश्न व इतर अडचणी मांडण्याची संधी मिळणार आहे. तरी या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, हुतात्मा सैनिकांचे वारस, नातेवाईक यांनी उपस्थित राहूल या स्तुत्य उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी सैनिक बी. टी. पाटील, माजी वायू सैनिक एम. डी. मुरलीधर देसाई यांनी केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रेखावार यांनी या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
अतिवृष्टी, महापूरासारख्या आपत्कालीन काळात करणार मदत
सध्या पावसाळा सुरू आहे. अतिवृष्टी, महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीला जिल्ह्यातील नागरिकांना सामोरे जावे लागण्याची भीती आहे. अशा कठिण प्रसंगी माजी सैनिक संकटात सापडलेल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी तत्पर आहेत. त्यांची मदत जिल्हा प्रशासन घेऊ शकते. या संदर्भातही माजी सैनिकांच्या या मेळाव्यात चर्चा होणार असल्याचे बी. टी. पाटील यांनी सांगितले.









