सुनेकडूनही होतेय मारहाण, आईकडून न्यायाची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
पोटचा पोरगाच जर आपल्या मातेची सतावणूक करून पत्नीकरवी मारहाण करीत असेल तर या वृद्ध मातेने जगायचे तर कशाच्या आशेवर. जो मुलगा स्वत: न्यायालयात बीलीफ म्हणून सेवेत आहे, अशा कायद्याच्या चौकटीत काम करणाऱ्या मुलाकडून एका मातेची सतावणूक सुरू आहे. सुन व मुलगा याच्या जाचामुळे गवळी-मौला, गोवा वेल्हा तिसवाडी येथील तुळसावंती तुळशीदास नाईक ही वृद्ध महिला असह्य बनली असून, तिला न्याय मिळावा, अशी मागणी तिने व तिच्या इतर मुलांनी केली आहे.
पणजी येथील साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला माहिती हक्क अधिकाराचे कार्यकर्ते राजन घाटे, तुळसावंती नाईक, सुरेश नाईक, शिल्पा नाईक व रिमा नाईक यांची उपस्थिती होती.
राजन घाटे यांनी सांगितले की, सुनील तुळशीदास नाईक हा म्हापसा न्यायालयात बीलीएफ म्हणून सेवेत आहे. सध्या तो पुंडलिकनगर पर्वरी येथे आपल्या पत्नीसमवेत भाड्याने राहतो. न्यायालयात कामाला असाल्याने त्याने आपले कोणीही वाकडे करू शकत नाही, या विचाराने आपल्या आईची सतावणूक सुरू केलेली आहे. गेले अनेक दिवस तो हरप्रकारे आईला त्रास देत आहे. शिवाय त्याची पत्नी प्रीतम एस. नाईक ही आपल्या सासूला मारहाण करते. गवळी-मौला येथे तुळसावंती नाईक यांच्या पतीचे घर असून, हे घर पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी ते सासूची सतावणूक करीत आहेत. या प्रकरणाची रितसर तक्रार पोलिसांत दिल्यानंतर तिसवाडी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडेही दिलेली आहे. आपल्या आईचा सांभाळ करण्याऐवजी मारहाण आणि सतावणूक करीत असल्याने संजय नाईक याला उपजिल्हाधिकाऱ्यांनी मेंटेनन्स अॅक्ट 7 या खाली आईच्या देखभालीसाठी म्हणून महिन्याला 7 हजार 500 ऊपये देण्याचा आदेश दिला आहे. तरीही संजय हा आपल्या आईला देखभालीचा खर्च म्हणून पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. शिवाय त्याला वडिलांचे घर हवे असल्याने तो त्यावरही पूर्ण हक्क गाजविण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारने किंबहुना न्यायालयाने तुळसावंती नाईक हिला न्याय द्यावा, अशी मागणीही घाटे यांनी केली आहे.
मुलानेच दुर्लक्ष केले तर, सांभाळणार कोण?
मुलगा संजय हा न्यायालयात कामाला आहे. इतर एक मुलगा सुरेश हा परिस्थितीने हतबल आहे. एक मुलगी शिल्पा ही अविवाहित आहे. तर दुसरी मुलगी रिमा हिला नवऱ्याने सोडून दिल्याने तीही परिस्थितीने पिचलेली आहे. अशा अवस्थेत या तिन्ही भावडांकडे लक्ष देण्याऐवजी संजय हा माझी वारंवार सतावणूक करीत आहे. शिवाय त्याची पत्नी प्रीतम ही वारंवार मारहाण व शिवीगाळ करते. त्यामुळे माझे जगणे असह्य झाले असून, सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी तुळसावंती तुळशीदास नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
तुळसावंतीसारख्या अनेक मातांना मिळावा आधार…
गोवा हे सुशिक्षित राज्य असले तरी आजही ज्येष्ठ लोकांना त्यांच्या मुलांकडूनच अपमानास्पद वागणूक मिळत आहे. वेळप्रसंगी मुलांचा मार सहन करून जीवन जगावे लागत आहे. केवळ तुळसावंती नाईक ही एकच महिला अपवाद नसून, अशा कितीतरी माता परिस्थितीने पिचलेल्या आहेत, त्यांना संरक्षण मिळणे गरजेचे असून, सरकारने माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्यांविऊद्ध कडक पाऊले उचलावीत व अशी प्रकरणे न्यायालयात आली असता त्याचा निकाल जलद गतीने लागावा, अशी मागणी राजन घाटे यांनी केली.









