प्रतिनिधी/ मडगांव
चारही बाजुनी पाणी आणि त्यात मधोमध असलेल्या एका झोपडीतील पाच पिल्लांना आणि नात्याने माता असलेल्या कुत्रीला शनिवारी सायंकाळी वाचविण्यात मडगावच्या अग्नी शमन दलाच्या जवानाना यश आले.
एका प्राणी मित्राने प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करुन हा प्रकार त्यांच्या कानी घातला आणि प्रशासकीय यंत्रणा कामाला लावण्याची विनंती केली.
त्याप्रमाणे यंत्रणा कामाला लागली.
मडगावच्या घाऊक मासळी मार्केटच्या पुढे बांधकाम चालू असलेल्या पुलाजवळ ही घटना. या जागी असलेल्या एका झोपडीला पावसाच्या पाण्याने चारही बाजुने घेरलेले. त्या झोपडीत एका कुत्रीने पाच पिल्लांना हल्लीच जन्म दिला होता. नैसर्गिक आपत्तीची कल्पना न आल्यामुळे आणि पाण्याची पातळी चढू लागल्यामुळे या कुत्रीने आरडा ओरड करण्यास सुरु केली. एका प्राणीमित्राला ही बाब समजली आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कानी ही घटना ऐकविली.
जलमय झालेल्या या परिसरात जायचे कठीणच होते. पाणी खोल होते. एकंदर प्रसंग पाहून लांबलचक शिडी, जवानानी आडवी घातली आणि झोपडीपर्यंत पोहाचले. मात्र पिल्लांच्या आईपर्यंत जायचे आणि तिला आडव्या शिडीवरुन सुरक्षित आणायचे कसबच होते. जवानांच्या दिमतीला एक स्थानिक लाभला आणि एकदाचे कुत्रीला आणि तिच्या पाचही पिल्लांना सुखरुप सुरक्षित जागी आणले. ही प्रक्रिया पाहणाऱ्यांच्या तोंडातून ‘माणुसकी अजुनही जिवंत आहे’ असे शब्द आले. या प्रकरणी मडगावचे फायर ऑफीसर श्री. घील व त्याच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे









