दोनवेळचा जगज्जेता कॅरेबियन संघ पात्रता फेरीत गारद : हॉलंडपाठोपाठ स्कॉटलंडकडून पराभूत
वृत्तसंस्था/ हरारे
जागतिक क्रिकेटवर एकेकाळी आक्रमक फलंदाजी आणि तुफानी गोलंदाजीच्या जोरावर अधिराज्य गाजविणाऱ्या कॅरेबियन देशांच्या वेस्ट इंडिज संघासाठी शनिवारचा दिवस नामुष्किजनक ठरला. भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (2023) पात्रता फेरीत वेस्ट इंडिज संघाला हॉलंड पाठोपाठ स्कॉटलंडकडून पराभव पत्करावा लागल्याने या संघाचे उरले सुरले आव्हानही संपुष्टात आले आहे. पात्रता फेरीत अपात्र ठरण्याची नामुष्की पत्करावी लागल्याने 50 षटकांच्या वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच गेल्या पन्नास वर्षांत ही स्पर्धा याआधी दोन वेळा जिंकत जगज्जेता ठरलेला वेस्ट इंडिजचा संघ प्रथम या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. कॅरेबियन देशातील क्रिकेट चाहत्यांबरोबरच अखंड क्रिकेट जगतातील वेस्ट इंडिजच्या चाहत्यांसाठी ही धक्कादायक घटना आणि बातमी ठरली आहे.
भारतात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सध्या झिम्माब्बेची राजधानी हरारे येथे पात्रता फेरी सुरू आहे. विश्वचषक स्पर्धेत याआधी कामगिरी आणि गुणांच्या आधारे यजमान भारतासह ऑस्टेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान हे आठ संघ पात्र ठरले आहेत. पात्रता फेरीतून दोन संघांना आपली पात्रता सिद्ध करत विश्वचषक खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी पात्रता फेरीत वेस्ट इंडिज संघावर साऱ्या क्रिकेट जगताच्या नजरा होत्या. चार सामन्यांपैकी दोन सामने वेस्ट इंडिज जिंकले पण दोन सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने वेस्ट इंडिज संघाचे पात्रता फेरीतील आव्हानच संपुष्टात आले आहे. याआधी हॉलंडविरूद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजला सुपर ओव्हरमध्ये पराभवाचा धक्का बसला होता. तेथेच या संघाच्या पात्रतेविषयी धोका निर्माण झाला होता. शनिवारी स्कॉटलंड विरोधचा सामना वेस्ट इंडिजसाठी अत्यंत महत्वाचा होता. पण या संघाने तुलनेने दुर्बल असलेल्या स्कॉटलंडविरूद्धच्या सामन्यातही हाराकिरी केली. स्कॉटलंडने हा सामना 7 गडी राखून जिंकला. या लढतीत प्रथम फलंदाजी करणारा वेस्ट इंडिजचा संघ 43.5 षटकात 181 धावसंख्येवर तंबूत परतला होता. आव्हानात्मक धावसंख्या उभी करण्यास अपयशी ठरलेल्या वेस्ट इंडिजचे तोकडे आव्हान स्कॉटलंड 43.3 षटकात केवळ तीन गड्याच्या मोबदल्यात आरामात पूर्ण करत कॅरेबियन संघाला पराभवाचा दणका दिला. या पराभवाने वेस्ट इंडिजचे वर्ल्डकप खेळण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. क्रिकेट जगतातही वेस्ट इंडिज संघ भारतातील वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसणार नसल्याने निराशा व्यक्त होते आहे.
भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आठ संघांनी आपले स्थान निश्चित केले आहे. याचवेळी, इतर दोन संघ सध्या झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीद्वारे स्पर्धेत प्रवेश करतील. वेस्ट इंडिजने उर्वरित दोन सामने जिंकले तरी त्याला टॉप-2 मध्ये स्थान मिळवता येणार नाही.
स्कॉटलंडचा दिमाखेदार विजय
प्रारंभी, स्कॉटलंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवताना स्कॉटलंडच्या गोलंदाजांनी कमाला केली. वेस्ट इंडिजचा डाव 43.5 षटकात केवळ 181 धावांवर आटोपला. विंडीजकडून, फक्त जेसन होल्डर आणि रोमॅरियो शेफर्ड यांना थोडा संघर्ष करता आला. होल्डरने 79 चेंडूंत 45 धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याचवेळी शेफर्डने 43 चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने 36 धावांची खेळी केली. स्कॉटलंडकडून ब्रँडन मॅकमुलेनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर ख्रिस सोल, मॉक वॅट आणि ख्रिस ग्रीव्हज यांना प्रत्येकी दोन गडी बाद केले.प्रत्युत्तरात स्कॉटलंडने विजयासाठीचे लक्ष्य 43.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू क्रॉसने 107 चेंडूत 7 चौकारासह सर्वाधिक 74 धावा केल्या. त्याचवेळी ब्रँडन मॅकमुलेनने 110 चेंडूत 8 चौकार व 1 षटकारासह 69 धावांची खेळी केली. जॉर्ज मुन्सेने 18 तर कर्णधार रिची बेरिंग्टन 13 धावांवर नाबाद राहिला.
1975 आणि 1979 चे विश्वविजेते वेस्ट इंडिज
कसोटी क्रिकेटला वेगवान केले ते 50 षटकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेने. 1975 साली पहिली आणि 1979 साली दुसरी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा इंग्लंडमध्ये झाली. दोन्ही स्पर्धा क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने जिंकल्या. त्यावेळी वेस्ट इंडिजची फलंदाजी आणि तिखट गोलंदाजी जगात लक्षवेधाणारी ठरली होती. मात्र बलाढ्या, बलवान वेस्ट इंडिजला 1983 च्या विश्वचषक स्पर्धेत महान ऑलराऊंडर कपिलदेवच्या भारतीय संघाने लॉर्डस्वर झालेल्या अंतिम लढतीत धक्कादायकरित्या पराभूत करत वर्ल्डकप जिंकला. लॉईडच्या नेतृत्वाखाली विश्वविजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्याचे वेस्ट इंडिजचे स्वप्न भंगले. पुढे लॉईडसह महान फलंदाज, गोलंदाज निवृत्त झाले. नंतर कालौघात वेस्ट इंडिज संघ कमकुवत होत गेला. व्हिव रिर्चडस्, रिची रिचडर्सन, कार्ल हुपर, ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल आदी महान खेळाडू देखील वेस्ट इंडिजला गतवैभव मिळवून देऊ शकले नाहीत. त्यात शनिवारी वेस्टइंडिजसाठी अपात्रतेच्या नामुष्कीचा दिवस ठरला.









