मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
गृहज्योती आणि अन्नभाग्य योजना शनिवारपासून जारी झाली आहे. अन्नभाग्य योजनेतील अतिरिक्त तांदळाऐवजी पैसे देण्याची प्रक्रिया 10 जुलैपासून सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. 1 जुलैपासून पैसे दिले जातील, असे आपण कोठेही सांगितले नव्हते. जुलै महिन्यात सर्व लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा केले जातील, असे स्षष्टीकरणही त्यांनी दिले.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. 1 जुलैपासून अन्नभाग्य योजना जारी होईल. पहिल्याच दिवशी पैसे जमा होतील, असे सांगितलेले नाही. 10 जुलैनंतर तांदळाऐवजी पैसे देण्यात येतील. जुलै महिन्यातच बीपीएल कुटुंबांना अतिरिक्त तांदळाऐवजी पैसे दिले जाईल. गृहज्योती योजना देखील जारी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात लाभार्थींना ‘शून्य बिल’ येईल. 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अन्न आणि नागरी पुरवठामंत्री के. एच. मुनियप्पा यांनी शुक्रवारी 1 जुलैपासूनच बीपीएल कुटुंबांना अतिरिक्त तांदळाऐवजी पैसे देण्यास प्रारंभ होईल, असे सांगितले होते. शनिवारी देखील त्यांनी याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे सिद्धरामय्या आणि मुनियप्पा यांनी केलेल्या वेगवेगळ्या विधानांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. शनिवारी पत्रकारांशी बोलताना मुनियप्पा यांनी बीपीएल कार्डधारकांना पैसे देण्याचे काम सुरू झाले आहे. एक आठवडा किंवा 10 दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे सांगितले.








