वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्याची केंद्र सरकारची योजना असून त्या विषयीचे विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात संसदेत सादर करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी केली आहे. ही घोषणा त्यांनी येथे होत असलेल्या 17 व्या भारतीय सहकार काँग्रेसच्या अधिवेशनात केली. आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या निमित्ताने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले असून शहा प्रमुख अतिथी आहेत.
बहुराज्यीय सहकारी संस्थांचे अर्थव्यवस्थेतले महत्व आता वाढत असून त्यांची कार्यप्रक्रिया अधिक सुलभ करण्याची आवश्यकता आहे. तसेच या सहकारी संस्थांचे अधिकार आणि व्याप्तीही कालमानानुसार वाढविली जाणे अपरिहार्य आहे. त्यामुळे सध्याच्या बहुराज्यीय सहकारी संस्था कायद्यात (एमएससीएस) सुधारणा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.









