पाच व दोन या फॉर्म्युल्यानुसार निवडणूक पडली पार, सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. निवडणूक होणार की स्थायी समित्या बिनविरोध होणार? याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता होती. मात्र भाजपची सत्ता तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांना घेऊन चारही स्थायी समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पाडण्यात आली. विकासासाठी आम्ही सारे एकजुटीने राहण्यासाठी स्थायी समितीची निवडणूक बिनविरोध केल्याचे आमदार राजू सेठ यांनी सांगितले.
स्थायी समितींची निवडणूक असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने सर्व ती तयारी पूर्ण केली होती. जर निवडणूक घ्यावी लागली तर मतदान घेण्याची सर्व प्रक्रिया सज्ज ठेवण्यात आली होती. मात्र सकाळी महापालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवक आणि आमदार राजू सेठ यांनी चर्चा करुन ही निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले. पाच व दोन या फॉर्म्युल्यानुसार या स्थायी समित्या करण्याचे ठरविण्यात आले. प्रारंभी काँग्रेसच्या नगरसेवकांनी चार व तीन चा पवित्रा घेतला होता. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी आम्ही निवडणूक घेण्यास तयार आहे. असे सांगितल्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनी त्यामधून माघार घेतली आणि पाच व दोन या फॉर्म्युल्यानुसार स्थायी समित्यांची निवड झाली.
सकाळी 10 वाजता स्थायी समित्यांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. सकाळी 10 ते दुपारी 12 अर्ज करण्यासाठी हा वेळ देण्यात आला होता. त्यानंतर 28 नगरसेवकांनी आपले अर्ज दाखल केले. 12 वाजता निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त नजमा पिरजादे यांनी 3 वाजल्यापासून निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होईल, असे सांगितले.
दुपारी 2.30 च्या दरम्यान सर्व नगरसेवक सभागृहात दाखल झाले. त्याचबरोबर खासदार, आमदार हे देखील दाखल झाले. 28 जागांसाठी 28 अर्ज आल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. जिल्हाधिकारी आणि प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी स्थायी समित्यांची निवड झाल्याचे जाहीर केले. स्थायी समितीमध्ये असलेल्या असलेल्या सदस्यांची नावे पुकारण्यात आली. त्याला सर्वांनीच सहमंती दर्शविली.

अर्थ, कर आणि अपिल स्थायी समिती सदस्य
वीणा श्रीशैल विजापुरे, रेखा मोहन हुगार, उदयकुमार विठ्ठल उपरी, संदीप अशोक जिर्ग्याळ, प्रिती विनायक कामकर, रेश्मा परवेज भैरकदार, शामोबीन सलीमखान पठाण
सार्वजनिक शिक्षण, आरोग्य व सामाजिक न्याय समिती
रवी कृष्णा धोत्रे, रमेश श्रीकांत मैलागोळ, रेशमा बसवराज कामकर, श्रेयश सोमशेखर नाकाडी, जयंत जाधव, खुर्शिद दादापीर मुल्ला, इकरा मुल्ला
नगर नियोजन व विकास स्थायी समिती
वीणा विलास जोशी, आनंद चव्हाण, मंगेश पवार, संतोष पेडणेकर, रुपा चिक्कलद्दिन्नी, जरीना फतेखान, शकिला मुल्ला
लेखा स्थायी समिती
सविता मुरगेंद्रगौडा पाटील, गिरीश धोंगडी, अभिजित जवळकर, जयतीर्थ व्यंकटेश सौंदत्ती, पूजा इंद्रजित पाटील, ज्योती राजू कडोलकर, अफरोज शकील मुल्ला अशी निवड करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी खासदार मंगला अंगडी, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार राजू सेठ, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील आदी उपस्थित होते. महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी अधिकाऱ्यांना सर्व ती तयारी सज्ज ठेवण्याची सूचना केली होती. त्यानुसार सभागृहामध्ये सर्व तयारी करण्यात आली होती. याचबराब्sार कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. नगरसेवक तसेच आमदार, खासदार व अधिकारी वगळता इतर कोणलाही प्रवेश देण्यात आला नाही.
म. ए. समितीच्या नगरसेवकांना डावलले
म. ए. समितीच्या महिला नगरसेविकेला एका समितीमध्ये घेण्याचे विनंती करण्यात आली. मात्र ती विनंती फेटाळण्यात आली. नेहमीच म. ए. समितीचे वर्चस्व महापालिकेवर असते. त्यावेळी म. ए. समितीने मोठ्या मनाने चार व तीन या नुसार स्थायी समित्या निवडल्या होत्या. विरोधी पक्ष असो किंवा अपक्ष यांना प्राधान्य दिले होते. मात्र भाजपने यावेळी समितीला पूर्णपणे डावलले असून काँग्रेसला जवळ करुन बिनविरोध स्थायी समित्यांची निवड केली आहे. तेंव्हा आता मराठी भाषिकांनी यापुढे तरी नगरसेवक निवडताना विचार करावा, असे मत माजी नगरसेवक तसेच मराठी भाषिक जनतेतून व्यक्त होत आहे.









