ऑनलाईन टीम
Buldhana Accident News : समृद्धी महामार्गावरील अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. बुलढाण्यातील या भीषण दुर्घटनेत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर पाच जखमींवर उपचार सुरु आहेत.या अपघाताच्या वेळी बसमध्ये 33 प्रवाशी असल्य़ाची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र यात चालक आणि ड्रायव्हर बचावल्याने अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.दरम्यान बुलढाण्यातील दुर्घटना टायर फुटल्याने नाही तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडली असल्याचा अहवाल अमरावती परिवहन विभागाने दिला आहे.नेमका कसा घडला अपघात जाणून घेऊया.
कसा घडला अपघात
विदर्भ ट्रव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याला जाणार होती. ही बस रात्री 9:30 वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती.प्रवाशी झोपेत असताना मध्यरात्री 1.30 वाजता बुलढाण्यातील सिंदखेडराजाच्या पिंपळखुटाजवळ बसला अपघात झाला. बस सुरुवातीला दुभाजकाच्या लोखंडी खांबावर धडकली. त्यानंतर बसने कठड्याला धडक दिली .बस उलटली आणि लगेचच बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूने गेल्याने कोणालाही बाहेर पडता आलं नाही. एवढ्यात बसने पेट घेतला. यातील काही प्रवाशांनी मागील काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळ्यांनाच हे शक्य नाही झाले. प्रवासी झोपेत असल्याने काही कळायच्या आत आगीचा भडका उडाला आणि या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला.जे मृत्यूच्या दाढेतून बचावले त्यांनी या अपघाताचा थरार सांगितला.
मृतांना सरकारने 5 लाखाची मदत केली जाहीर
अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. या अपघातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींवर सरकारकडून उपचार करण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर जखमींना उपचारासाठी ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.पंतप्रधान निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत देण्यात आली आहे.दुर्घटनेबद्दल अमित शाहांकडून शोक व्यक्त कऱण्यात आला आहे.तर ड्रायव्हरला झोप आल्याने ही दुर्घटना घडली असावी, अशी शंका भाजप नेते गिरीश महाजन यांनी उपस्थित केली.
या अपघातानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी साधला निशाणा
अपघात रोखण्यासाठी उपायोजना करा-शरद पवार
बुलढाणा अपघाताची दुर्घटना दुर्देवी आहे. महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. 5 लाखांची मदत करून प्रश्न सुटनार नाही.अपघात रोखण्यासाठी उपायोजना करा अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
समृद्धी महामार्ग शापित महामार्ग- संजय राऊत
समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग आहे. या रस्त्यात अनेकांचे अश्रू आणि शाप आहेत. त्यामुळे या महामार्गावर सतत अपघात होत असावेत, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
हा अपघात नसून हा घात-इम्तियाज जलाल
रोड सुरक्षा न पाहता समृध्दी महामार्गाचं उद्घाटन केलं गेलं. हा अपघात नसून हा घात असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलाल यांनी केली. बुलढाण्यातील घात शिंदे, फडणवीसांनी केला असा आरोपही त्यांनी केला आहे.








