प्रतिनिधी,रत्नागिरी
Ratnagiri Suicide News : मैत्रीणीसोबत मंदिरात गेलेल्या २२ वर्षीय तरुणाने मैत्रिण फोनवर बोलत असताना वायरने गळफास घेत आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे घडला आहे. कुणाल रवींद्र वांद्रे असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना धामणवणे येथे बुधवारी (ता- २८ जून) दुपारी १२:३० वाजता घडली.
धामणवणे विठलाई मंदिराच्या पुढील बाजूस असलेल्या शेडमध्ये लोखंडी अँगलला कुणालने गळफास घेतला आहे.कुणाल आपल्या मैत्रिणी समवेत धामणवणे येथे विठलाई मंदिराच्या ठिकाणी गेला होता.ती मंदिरापासून काही अंतरावर एका बाजूला फोनवर बोलत असताना हा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं
परशुराम पायरवाडी येथे राहणारा कुणाल बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर लोटे औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला होता.त्यानंतर तो महाड येथील एका कंपनीत रुजू झाला.बुधवारी सकाळीच तो महाडहून गावी आला होता.त्यानंतर तो आपल्या मैत्रिणीला घेऊन लगतच्याच धामणवणे येथील विठाई मंदिरात गेला होता. मैत्रिण फोनवर बोलत बाजूला गेली असता त्याने वायरने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत कुणालच्या भावाने पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. या घटनेबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. चिपळूण पोलिस अधिक तपास करत आहेत. कुणालच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे.










