बेकिनकेरे येथील घटना : जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार
बेळगाव : बेकिनकेरे-गोजगा येथे शेतकरी भात पेरत असताना अचानक काहीजणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना बेकिनकेरे येथे गुऊवारी घडली. यामध्ये शेतकरी, लहान मुले व महिलादेखील जखमी झाल्या आहेत. गंभीर जखमी झालेल्यांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित कुटुंबीयांनी व ग्रामस्थांनी केली आहे. बेकिनकेरे येथील जोतिबा सावंत, राजू सावंत, पुंडलिक सावंत यांची गोजगा गावच्या हद्दीमध्ये जमीन आहे. गेल्या 80 वर्षांपासून त्यांच्याकडे ही जमीन असून कुळकायद्याने त्यांना जमीन मंजूर झाली आहे. याबाबत न्यायालयात खटलाही सुरू आहे. असे असताना 60 ते 70 जणांनी अचानकपणे त्या कुटुंबावर हल्ला केला आहे. यामध्ये वरील तिघेही जखमी झाले आहेत. याचबरोबर सुनीता पुंडलिक सावंत, कविता राजू सावंत, वनिता जोतिबा सावंत, अभिषेक पुंडलिक सावंत, कार्तिक राजू सावंत, श्री राजू सावंत, विघ्नेश्वर जोतिबा सावंत हे जखमी झाले आहेत. गोजगा येथील सर्व्हे क्रमांक 85/1, 85/2 ही जमीन या कुटुंबाकडे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कब्जा असून हे कुटुंबीय सदर जमीन कसत आहे. मात्र यावर्षी अचानकपणे भातपेरणी करताना हा हल्ला झाला आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना अचानक 60 ते 70 जणांना घेऊन हल्ला केला आहे. तेव्हा पोलिसांनी या सर्वांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत काकती पोलिसात दोघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









