पुणे / प्रतिनिधी :
जून महिन्यात देशभरात सरासरीच्या उणे 10 टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. मात्र, जुलै महिन्यात दमदार पाऊस राहणार असून, मान्सून सरासरी गाठणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम मोहोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत वर्तविला. दरम्यान, प्रशांत महासागरात एलनिनोची स्थिती विकसित होत असून, सध्या ती न्यूट्रल अवस्थेत आहे. जुलै महिन्याच्या शेवटी एल निनो विकसित होणार असून, इंडियन ओशन डायपोलही मान्सूनभर सकारात्मक राहणार आहे, असेही डॉ. मोहोपात्रा यांनी सांगितले.
डॉ. मोहोपात्रा यांनी जून महिन्याचा आढावा तसेच जुलै महिन्याचा अंदाज वर्तविला. ते म्हणाले, जून महिन्यात वादळ, उष्णतेची लाट तसेच मुसळधार पाऊस अशी स्थिती होती. बिपोरजॉय चक्रीवादळाने सुरुवातीला मान्सूनची पश्चिम शाखा पुढे नेली, नंतर मात्र या स्थितीमुळे पश्चिम शाखाच अडखळून पडली. पूर्व शाखा या तुलनेत सक्रिय राहिली. यानंतर 25 जूनच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रात तयार झालेले बाष्प, बिपोरजॉयच्या जमिनीवरील प्रभाव यामुळे जूनच्या शेवटच्या आठवडय़ात मान्सूनच्या दोन्ही शाखा सक्रिय झाल्या असून, सर्वत्र जोरदार पाऊस होत आहे. तरीदेखील यावर्षी जून महिन्यात सरासरीच्या उणे 10 टक्के पाऊस झाला आहे.
जुलै महिन्यात दमदार पाऊस ; सरासरी गाठणार (94 ते 106 टक्क्यांदरम्यान पाऊस )
जुलै महिन्यात देशभरात सरासरी इतक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात 94 ते 106 टक्क्यांदरम्यान पाऊस राहणार आहे. त्यात मध्य भारत, पश्चिम किनारपट्टी, तामिळनाडू वगळता पूर्व किनारपट्टी, पूर्वोत्तर भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा चांगला पाऊस होणार आहे.
चांगल्या पावसाची राज्ये
याअंतर्गत महाराराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तेलंगण, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा, झारखंड, पश्चिम बंगाल, पूर्वोत्तर भागातील काही राज्ये
तुटीचा पाऊस
जुलै महिन्यात तामिळनाडूचा बराचसा भाग, दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्र,आसाम, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, पंजाब व जम्मू-काश्मीरच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची चिन्हे आहेत. याबरोबरच मध्य भारत, पश्चिम किनारपट्टी, वायव्य भारत, गंगेच्या खोऱयातील राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक, तर पूर्वोत्तर राज्यात सर्वाधिक राहणार आहे. किमान तापमान देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक राहण्याचे संकेत आहेत.
एल निनो, आयओडी न्यूटॅल
सध्या एल निनो आणि आयओडी स्थिर स्थितीत आहेत. पूर्व प्रशांत महासागराचे तापमान पश्चिम महासागराच्या तुलनेत अधिक गरम आहे. समुद्रसपाटीचे तापमान हळूहळू वाढत आहे. जुलै महिन्याच्या शेवटी एल निनो विकसित होणार आहे. आयओडीही सध्या स्थिर असून, यानंतर तो सकारात्मक होणार आहे.
जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस
संपूर्ण जुलै महिन्यात महाराष्ष्ट्रात चांगला पाऊस राहणार आहे. यात जुलैच्या पहिल्या आठवडय़ात कोकण-गोवा, तसेच बाकीच्या आठवडय़ात महाराष्ट्रभर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पावसाचा जोर ओसरणार
शनिवारपासून राज्यातील बहुतांश जिल्हय़ातील ऑरेंज अलर्ट हटणार असून, पावसाचा जोर कमी होणार आहे. मात्र, पुढील पाच दिवस कोकण-गोवा किनारपट्टीवर हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तर, 3 जुलै व 4 जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट मुंबई हवामान विभागाने दला आहे.
4 जुलैला कमी दाबाचे क्षेत्र
4 जुलैच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. याच्या प्रभावामुळे मध्य भारतात चांगला पाऊस होणार असल्याचे डॉ. मोहोपात्रा यांनी सांगिलते.
जून महिना महाराष्ट्रासाठी तुटीचा
जून महिन्याच्या शेवटी राज्यात मान्सून बरसला असला तरी, हा महिना पावसाच्या दृष्टीने तुटीचा ठरला आहे. ही तूट आता 50 टक्क्यांवर पोहोचली आहे.









