पुलाच्या ठिकाणी केरकचरा टाकण्याचे प्रमाण वाढले : नदीत झाडे-झुडुपे वाढलेली : संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांचे स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष
वार्ताहर /किणये
आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होऊन आठ दिवस झाले तरी अद्याप म्हणावा तसा पावसाने जोर घेतला नाही. तालुक्यातील नदी-नाले पावसाअभावी कोरडेच आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील संतिबस्तवाड-किणये परिसरात मुंगेत्री ही एकमेव नदी आहे. मात्र या नदीत झाडे-झुडुपे वाढली आहेत. नदीवरील पुलांच्या ठिकाणी केरकचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मुंगेत्री नदीच्या अस्तित्वासाठी संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. संतिबस्तवाड, बहाद्दरवाडी, शिवनगर, रणकुंडये, वाघवडे या भागातून जाणारी मुंगेत्री नदी सध्या झाडे-झुडुपे व अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली आहे. पावसामुळे सध्या नदी कोरड्या अवस्थेत आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायीनी ठरणाऱ्या या नदीकडे संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी शेतकरीवर्गातून होत आहे. किणये डोंगर परिसरात या नदीचा उगम झाला आहे. किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, संतिबस्तवाड, वाघवडेमार्गे ही नदी खानापूरच्या मलप्रभा नदीला जाऊन मिळते. या नदीच्या पाण्यावर पूर्वी शेतकरी विविधप्रकारची पिके घेत होते. अलीकडे नदीच्या देखभालीकडे लघु पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे उन्हाळ्यातही व सद्यस्थितीतही नदी कोरडी पडलेली आहे.

नदीचे सौंदर्य धोक्यात
संतिबस्तवाड, किणये परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नदीच्या काठावर आहेत. मुसळधार पाऊस असताना नदीच्या पाण्याचा प्रवाह चांगला असतो. किणयेपासून वाघवडेपर्यंतच्या नदीवर ठिकठिकाणी छोटे बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्र नदीचे पाणी कमी होत असताना पाणी अडवले जात नाही, अशी माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे. बेळगाव-चोर्ला रोड किणयेनजीक, संतिबस्तवाड पुलाजवळ व वाघवडे पुलानजीक नदीमध्ये व नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात केरकचरा टाकण्यात आलेला आहे. यामुळे या नदीचे सौंदर्य धोक्यात आले असल्याचे माहिती पर्यावरणप्रेमी नागरिकांनी दिली आहे.
नदीत पाणी अडविणे गरजेचे
या भागातील नागरिक शेतीसह जोड व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय करतात.बहुतांशी शेतकऱ्यांकडे दुभती जनावरे आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी या नदीच्या पाण्यावर आपण अधिक प्रमाणात जनावरांचे पालन करीत होतो, अशी माहिती वडीलधारी मंडळींनी दिली आहे. नदीत पाणीसाठा असणाऱ्या कालावधीत पाणी अडविणे गरजेचे आहे. नदीचे पाणी अडविल्यास या भागात जनावरांसाठी व शिवारातील पिकांसाठी उपयोगाचे ठरू शकते. या भागातील ही एकमेव नदी असून नदीचे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी किणये व संतिबस्तवाड या दोन्ही ग्राम पंचायतीच्यावतीने अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.
नदीतील गाळ काढल्यास शेतीसाठी पाणी उपयोगी
यंदा पावसाने हुलकावणी दिली असल्याने खरीप हंगामाचे गणित कोलमडले आहे. या भागात असणारी मुंगेत्री नदी कोरडी पडली आहे. उन्हाळ्यात मुंगेत्री नदीतील गाळ काढल्यास तसेच नदीतील झाडा झुडुंपाची साफसफाई केल्यास पाण्याचा प्रवाह चांगला होऊ शकतो. तसेच अशा दुष्काळी परिस्थितीत नदीचे पाणी अडवून शेतशिवारासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. याचसाठी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
– मेघो बिर्जे









