वृत्तसंस्था/ दुबई
ग्लोबल चेस लीगमध्ये त्रिवेणी कॉन्टिनेंटल किंग्सने चिंगारी गल्फ टायटन्सविऊद्ध आठव्या फेरीत 10-9 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. बदली खेळाडू सारा खादेमच्या महत्त्वपूर्ण विजयामुळे त्यांची ही सरशी होऊ शकली. दुसरीकडे, गंगा ग्रँडमास्टर्सने दोन पराभवांनंतर महत्त्वपूर्ण पुनरागमन करताना बालन अलास्कन नाइट्सचा 8-7 ने पराभव केला. ही लढत चुरसपूर्ण राहिली आणि त्यात 114 चाली चाललेला सामनाही पाहायला मिळाला.
टायटन्स आणि किंग्स या दोन्ही संघांना लीगमध्ये संघर्ष करावा लागलेला असून आठव्या फेरीला सुऊवात केली त्यावेळी ते तळाकडे होते. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. परंतु टायटन्सचा अतिरिक्त सामना अनिर्णित राहिल्याने त्यांना एकूण सात गुण मिळाले आहेत, जे किंग्सपेक्षा एकाने जास्त आहेत. या दोन्ही संघांमधील मागील सामना अनिर्णित राहिला होता. किंग्स संघाला चित्र फिरवण्याची ही शेवटची संधी होती. प्रथम टायटन्सच्या शाख्रियार मामेदयारोव्हने यू यांगईचा पराभव केला, तर निहाल सरिनने जोनास बुहल बजेरेला पराभूत केले. त्यामुळे टायटन्सला आठ गुण मिळाले
तथापि, लेव्हॉन अॅरोनियनने डुडाला पराभूत केले, तर वेई यीने दुबोव्हला नमवविले. अलेक्झांड्रा कोस्टेनियुक आणि कॅटेरिना लाग्नो यांचा सामना अनिर्णीत राहिल्यानंतर चिंगारी गल्फ टायटन्सच्या बाजूने 9-7 अशी परिस्थिती झाली होती. त्यामुळे सारा खादेम आणि पोलिना शुवालोवा यांच्यातील लढतीवर सामन्याचे भवितव्य अवलंबून होते. त्यात सारा खादेमने आत्मविश्वासपूर्णरीत्या खेळ करून विजय मिळविला आणि किंग्सची 10-9 अशी सरशी झाली.
दुसरीकडे, गंगा ग्रँडमास्टर्स सुऊवातीपासून लीगवर वर्चस्व गाजवत आले आहेत. परंतु नंतर त्यांना सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना 12 मॅच पॉइंट्सनिशी दुसऱ्या स्थानावर जावे लागले होते. मात्र या सामन्यातून त्यांनी पुनरागमन केले आहे. बालन अलास्कन नाइट्सच्या संघाने फेरी सुरू केली तेव्हा त्यांचे सहा गुण झाले होते. टेलमोर रॅडजाबोव्ह आणि लेनियर डोमिंग्वेझ यांच्यातील पहिला सामना अनिर्णित राहिला. विश्वनाथन आनंद व नेपोम्नियाच्ची यांच्यातील लढतीही बरोबरीत राहिली. ‘प्रॉडिजी’ खेळाडूंमधील सामन्यात अँड्रे एसीपेन्कोने रौनक सधवानीला पराभूत केले, तर हाऊ यिफान व तान झोंगयी यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. नाइट्सच्या नोदिरबेक अब्दुसत्तारोव्हने रिचर्ड रॅपोर्टला हरविले. मात्र नाइट्सची निनो बातियाशविल्ली आणि बेला खोटेनाशविल्ली यांच्यातील सामना बरोबरीत राहिल्याने गंगा ग्रँडमास्टर्सचा निसरड्या फरकाने विजय झाला.









