इराणला नमवत आठव्यांदा पटकावले जेतेपद :42-32 फरकाने मिळवला विजय : पवन सेहरावत ठरला विजयाचा हिरो
वृत्तसंस्था/ बुसान (दक्षिण कोरिया)
दक्षिण कोरियातील बुसान येथे झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये भारताने तब्बल आठव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने इराणवर 42-32 असा विजय मिळवला. विशेष म्हणजे, नऊ वेळा आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप झाली असून आतापर्यंत भारताने आठवेळा बाजी मारली आहे. तसेच या स्पर्धेतील सहाही सामन्यात भारत अजिंक्य राहिला. पवन सेहरावत 13, अस्लम इनामदार 8 व अर्जुन देसवाल 5 गुणाची कमाई करत भारताच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली.
या विजयानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह भारतीय क्रीडा महासंघाने भारतीय संघाचे कौतुक केले आहे. आठव्यांदा आशियाई जेतेपद जिंकणाऱ्या भारतीय संघाचे विशेष अभिनंदन, असे ट्विट क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांनी केले आहे.
इराणला नमवत जिंकले सुवर्ण
शुक्रवारी दुपारच्या सत्रात बुसान येथील क्रीडा संकुलात भारत व इराण यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला. सामन्याच्या सुरुवातीपासून भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व राखले. सुरुवातीच्या पाच मिनिटांत इराणचा पुरुष कबड्डी संघ भारताविरुद्ध गारद झाला. खेळाच्या 10 व्या मिनिटाला पवन सेहरावत आणि अस्लम इनामदार यांच्या यशस्वी चढाईनंतर इराणला ऑलआऊट करण्यात टीम इंडियाला यश आले. यानंतर टीम इंडियाने मागे वळून पाहिले नाही. पहिल्या हाफमध्ये भारताने 23-11 अशी आघाडी मजबूत केली होती. पण नंतर कर्णधार मोहम्मदरेझा शादलुईच्या सुरेख खेळामुळे इराणने उत्तरार्धात पुनरागमन केले. दुसऱ्या सत्रात इराणकडून चांगला खेळ पाहायला मिळाला. 33-14 अशा पिछाडीवर असलेल्या इराणने सामना 38-30 असा चुरशीचा बनवला. त्या सत्रात भारताला केवळ पाच गुण मिळवता आले, पण दुसऱ्या बाजूला इराणने 16 गुणांची कमाई केली करत सामन्यात रोमांचकता आणली. शेवटच्या टप्प्यात भारताच्या खेळाडूंनी दमदार खेळ करत 42-32 असा रोमहर्षक विजय मिळवला.
भारताच्या विजयात कर्णधार पवन शेरावतचे योगदान मोलाचे ठरले. त्याने 10 गुण मिळवत भारताच्या विजयाचा पाया रचला. पवन शेरावत आणि अस्लम इनमादारने यशस्वी रेड केली. याशिवाय, अनेक टॅकल पॉईंटही मिळवले. या सामन्यात भारतीय खेळाडूंकडून अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. ज्यामुळे भारताचा संघ आठव्यांदा आशियाई कब•ाr चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकवण्यात यशस्वी ठरला.
संपूर्ण स्पर्धेत भारत अजिंक्य
यंदाच्या आशियाई स्पर्धेत तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय कबड्डी संघाने संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा राखला. हाँगकाँग, भारत, इराण, जपान, कोरिया आणि चायनीज तैपेई असे सहा संघ होते. भारताने असोसिएशन स्टेजमधील पाचपैकी प्रत्येक सामने जिंकले आणि फोकस टेबलमध्ये सर्वोत्तम स्थान मिळवले. दरम्यान, अंतिम सामन्याआधी साखळी फेरीत गुरुवारी भारताने इराणचा 33-28 असा पराभव केला होता. याआधी स्पर्धेत भारताने जपानचा 62-17, यजमान दक्षिण कोरियाचा 76-13, चिनी तैपेईचा 53-20 आणि हॉंगकॉंगचा 64-20 असा पराभव केला होता.
आशियाई कबड्डीतील जेतेपदे
1980, 1988, 2000, 2001, 2002, 2005, 2017 व 2023.

आशियाई कबड्डीत भारताने आठव्यांदा जेतेपद पटकावले याचा फार आनंद आहे. विशेष लागोपाठ दोन सामन्यात इराणला नमवल्याचा आनंदही आहे. सांघिक खेळामुळेच जेतेपद मिळवता आले आहे. आता, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेच्या तयारीवर भर असणार आहे.
पवन सेहरावत, भारतीय कर्णधार.









