वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय महिला क्रिकेट संघ जुलै महिन्यात बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघामध्ये 3 वनडे तसेच 3 टी-20 असे एकूण 6 सामने खेळविले जाणार आहेत. उभय संघातील हे सर्व 6 सामने ढाक्यामध्ये होतील, अशी घोषणा बांगलादेश क्रिकेट मंडळाने केली आहे.
भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघामध्ये 9, 11 आणि 13 जुलै रोजी टी-20 चे 3 सामने होणार आहेत. त्यानंतर उभय संघात 16, 19 आणि 22 जुलै रोजी 3 वनडे सामने खेळविले जातील. गेल्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला उपांत्य फेरीत बलाढ्या ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली होती. भारतीय महिला क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक लवकरच मिळेल, असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. ऋषीकेश कानिटकर हे सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे फलंदाज प्रशिक्षक असून आगामी बांगलादेश दौऱ्यासाठी त्यांची भारतीय महिला संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.









