वृत्तसंस्था/ अॅस्टेना (कझाकस्तान)
येथे सुरु असलेल्या इलोर्डा चषक आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या पाच मुष्टीयोद्ध्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. गुरुवारी या स्पर्धेतील झालेल्या लढतीत भारताच्या जोराम मुआना, पी. किशनसिंग, शिक्षा, आशिषकुमार आणि हेमंत यादव यांना प्रतिस्पर्ध्यांकडून हार पत्करावी लागली. टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेता कझाकस्तानचा बीबोसिनोव्हने भारताच्या जोराम मुआनाचा 51 किलो वजन गटातील लढतीत 5-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्यफेरी गाठली आहे. पुरुषांच्या 54 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या मोल्डासेव्हने भारताच्या पी. किशनसिंगचा 5-0 असा फडशा पाडला. पुरुषांच्या 57 किला वजन गटात थायलंडच्या सुकेत सेराऊतने भारताच्या आशिषकुमारवर 5-0, कझाकस्तानच्या शेकिनोव्हने भारताच्या हेमंत यादवचा 5-0 तसेच 54 किलो वजनी गटात कझाकस्तानच्या शिकेरबिकोव्हाने भारताच्या शिक्षाचा 5-0 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. मात्र 60 किलो गटात भारताच्या विजयकुमारने तसेच 63 किलो गटात महिलांच्या विभागात भारताच्या निमाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.









