बिरेन सिंह यांनी समर्थकांच्या दबावामुळे बदलला पद सोडण्याचा निर्णय : फाडलेला राजीनामा व्हायरल
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना एकीकडे सुरू असतानाच राजकीय हालचालीही वाढल्या आहेत. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू असली तरी त्यांनी स्वत:च त्याचा इन्कार केला आहे. खुद्द मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी एक ट्विट करून या चर्चांचे खंडन केले आहे. या कठीण काळात मी राजीनामा न देता जनतेच्या पाठीशी उभा राहीन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राजीनामापत्र तयार केले होते, परंतु समर्थकांच्या दबावाखाली त्यांनी ते फाडल्याचे निदर्शनास आले असून त्याचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची अफवा पसरताच इंफाळमध्येही हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. त्यांच्या निवासस्थानाभोवती बरेच समर्थक जमा झाले होते. दुपारी काळे शर्ट घातलेले शेकडो तऊण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बसून बिरेन सिंह यांनी राजीनामा देऊ नये, अशी मागणी केली. त्यामध्ये महिलांची संख्याही मोठी होती. हजारो आंदोलकांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन एन. सिंह यांच्या वाहनताफ्याला राजभवनाकडे जाण्यापासून रोखले. याचदरम्यान महिला नेत्यांनी त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देत नसल्याचे आश्वासन दिल्याचे जमावाला सांगताच, जमाव त्यांच्या निवासस्थानातून हळूहळू पांगला.
राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारामुळे बिरेन सिंह मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा विचार करत असल्याची अफवा सकाळपासून इंफाळमध्ये पसरली होती. मात्र, त्यांना समर्थकांपुढे नमते घ्यावे लागले. शुक्रवारी सकाळपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होती. मात्र, सायंकाळच्या दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करून राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला.
इंटरनेट बंदी 5 जुलैपर्यंत कायम
राज्यात मे महिन्याच्या प्रारंभापासून सुरू झालेला हिंसाचार अजूनही सुरूच आहे. हिंसाचार थांबत नसल्यामुळे सरकारने इंटरनेट बंदीची मर्यादा 5 जुलैपर्यंत वाढवली आहे. मणिपूरच्या कांगपोकपी जिह्यात सुरक्षा दल आणि संशयित दंगलखोर यांच्यात गुरुवारी गोळीबार झाला होता. सशस्त्र दंगलखोरांनी हरोथेल गावात बेछूट गोळीबार केल्यामुळे लष्कराला प्रत्युत्तर द्यावे लागले. या ताज्या घटनेतील मृतांची संख्या शुक्रवारी तीन झाली.
राहुल गांधींनी केले शांततेचे आवाहन
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मणिपूरला भेट देऊन शांततेचे आवाहन केले आहे. त्यांनी शुक्रवारी मदत छावण्यांना भेट दिली आणि हिंसाचारग्रस्तांची भेट घेतली. यानंतर राज्यपालांची भेट घेत त्यांनी राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली. राहुल गांधी शुक्रवारी सकाळी 9.30 च्या सुमारास हेलिकॉप्टरने मोइरांग येथे पोहोचले. त्यांनी येथील बाधितांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. राहुल यांनी भेट दिलेल्या दोन छावण्यांमध्ये सुमारे 1000 लोक राहत असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी यांच्यासोबत मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग, पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, पीसीसी अध्यक्ष कीशम मेघचंद्र सिंह आणि माजी खासदार अजय कुमार उपस्थित होते.
लोकांची व्यथा
सध्या राज्यात सुरू असलेला संघर्ष केंद्र आणि राज्य सरकारने लोकशाही मार्गाने सोडवावा, अशी मागणी लोकांकडून होत आहे. सध्याच्या हिंसक वातावरणात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर इथली जनता कशी जगणार? आमचे नेतृत्व कोण करेल? असे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या लोकांनी उपस्थित केले होते. संघर्षाच्या सुऊवातीपासून ते आमचे नेतृत्व करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची इच्छा नाही. आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, असेही म्हणणे लोकांनी मांडले.