वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काही निवडक अल्पबचत योजनांमधील ठेवींवरील व्याजदरांमध्ये 0.3 टक्के पर्यंत वाढ करण्याची घोषणा केंद्र सरकारने शुक्रवार, 30 जून रोजी केली. ही वाढ जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी असेल. बँकांच्या व्याजदरात वाढ करण्यात आल्याने अल्पबचत योजनांसाठीही हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
अल्पबचत योजनेअंतर्गत पाच वर्षे कालावधीसाठीच्या रिकरिंग ठेवीवर 0.3 टक्के व्याजदरवाढ देण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी हा व्याजदर 6.5 टक्के असेल. तर एक वर्ष कालावधीच्या ठेवींवरील व्याजदरात 0.1 टक्का वाढ करण्यात आली असून हा दर आता 7.0 टक्के होत आहे. मात्र, तीन वर्षे आणि 5 वर्षे कालाधीच्या ठेवींवरील व्याजदर पूर्वीप्रमाणेच, अर्थात, अनुक्रमे 7 टक्के आणि 7.5 टक्के असे ठेवण्यात आले आहेत. तर लोकप्रिय असणाऱ्या पीपीएफ ठेवींवरील व्याजदर सध्याच्या 7.1 टक्क्यांवर राखण्यात आले आहेत. पोस्ट बचत खात्यातील पैशांसाठी सध्याचाच 4 टक्के व्याजदर कायम आहे. सुकन्या बचत योजनेचा व्याजदरही सध्याइतकाच 8 टक्के ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेतील ठेवीचा व्याजदर पूर्वीप्रमाणेच 8 टक्के, तर किसान विकास पत्रावरील व्याजदर 7.5 टक्के राखण्यात आला आहे. मासिक प्राप्ती योजनेतील ठेवीचा व्याजदर 7.4 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे.
तिसरी वाढ
जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून अशा मागच्या दोन तिमाहींमध्येही व्याजदरात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे व्याजदर वाढविले जाण्याची ही सलग तिसरी तिमाही आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने कर्जांवरील मासिक हप्ता वाढला होता. त्याचप्रमाणे बँकांनी ठेवींवरील व्याजदरही वाढवले होते.









