आकार पाहून लोकांचा थरकाप
कासवाचे आयुर्मान सर्वाधिक असते हे ऐकले असेल. जोनाथन नावाचा कासव आता 190 वर्षांचा झाला आहे, तसेच मगरींचे आयुर्मानही अत्यंत अधिक असते. सध्या एक मगर चर्चेत असून तिने अलिकडेच स्वत:चा 120 वा जन्मदिन साजरा केला आहे. या मगरीला सर्वात वृद्ध मगर मानले जाते. परंतु या मगरीच्या नावावर विक्रम मात्र त्याच्या आकारावरून नेंद झाला आहे. ही मगर जगातील सर्वात मोठ्या आकाराची मगर आहे.

कॅशियस नावाची मगर ऑस्ट्रेलियाच्या एका मगरींसाठीच्या पार्कमध्ये असून तिचे वय 120 वर्षे इतके आहे. मगरींचा आकार प्रारंभी वेगाने वाढत असतो, परंतु वृद्ध होऊ लागताच त्यांचा आकार वाढण्याचा वेग कमी होत जातो. याचमुळे 70 वर्षीय मगर अन् 80 वर्षीय मगरीत कुठलाच विशेष फरक दिसून येत नाही. तरीही तंत्रज्ञानाच्या मदतीने पॅशियसचे वय मोजण्यात आले आहे. या मगरीचा जन्म 1903 मध्ये झाला असावा असे वैज्ञानिकांचा अंदाज आहे. ही मगर खाऱ्या पाण्यातील असून तिला गिनिज वर्ल्ड रेकॉर्डकडून देखील सर्वात मोठ्या मगरीचा मान मिळाला आहे.
ही मगर 18 फूट लांब असून सध्या मरीनलँड मॅरिनेशिया पार्कमध्ये तिचा वावर आहे. 1980 च्या दशकात या मगरीकडे माणसांचे लक्ष वेधले गेले होते. त्यावेळी या मगरीने मोठे नुकसान घडवून आणले होते. ऑस्ट्रेलियाच्या डारविन भागात तेव्हा गुरं मोठ्या प्रमाणात गायब होत होती. एका शेतकऱ्याने या विशाल मगरीला गुरांना फस्त करताना पाहिले होते. त्यानंतर प्रशासनाकडून या मगरीला पकडण्यात आले होते. त्यावेळी या मगरीचा आकार सुमारे 16 फूट इतका होता. 1987 मध्ये या मगरीला क्रोकोडाइल पार्कमध्ये आणले गेले आणि तेव्हापासून ती इथेच राहत आहे.

अन्य मगरींशी संघर्ष
सुमारे 40 वर्षांमध्ये तिचा आकार 2 फुटांनी वाढला आहे. तिच्या शरीरावर अनेक घाव आहेत, यातून तिचा इतर मगरींसोबत संघर्ष झाल्याचे स्पष्ट होते. तसेच तिने अनेक नौकांवर हल्ले केल्याचे संकेत मिळाले आहेत. ही मगर आणखी 20 वर्षे जगू शकते, असे तिचे आरोग्य पाहून वैज्ञानिकांनी मत व्यक्त केले आहे.









