कारवारच्या श्याम पाटीलची पत्नी, मुलासह आत्महत्त्या, गोव्यात चांगला कंत्राटदार म्हणून होता नावलौकिक
प्रतिनिधी / मडगाव
वेर्णा औद्योगिक वसाहतीत शाम इंडस्ट्रियल सर्व्हिसेस’ आस्थापनाचे मालक शाम पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबाने बुधवारी आत्महत्या केली आणि काल गुरुवारी आषाढी एकादशीच्या दिवशी ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी आलेली आर्थिक विवंचना हे या तिघांच्या आत्महत्येचे कारण आहे.
शाम पाटील (50), त्यांची पत्नी ज्योती पाटील (44) आणि 12 वर्षीय मुलगा दक्ष अशी मयतांची नावे आहेत. शाम पाटील हे मूळ कारवार जिल्ह्यातील गोकशिता या गावातील असून कामानिमित्त ते गोव्यात माटवे-दाबोळी (मुरगाव) येथे राहत होते. त्यांचा तेथे आलिशान बंगला आहे. झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी आपण आर्थिक संकटात सापडलो असून आता त्यातून आपली सुटका होण्याची शक्यता नाही, हे कळून आल्यावर त्यांनी हा आत्महत्येचा मार्ग पत्करला. त्यांच्या मुलाचा आणि पत्नीचा मृतदेह कारवारजवळच्या देवबाग समुद्रकिनारी काल गुरुवारी 29 रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सापडला.
व्हिडिओमधून केले आवाहन
ज्यावेळी या 12 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला तेव्हा तेथील स्थानिकांनी यासंबंधी कारवार पोलिसांना घटनेची कल्पना दिली. पोलीस देवबाग किनारी आले. तोपर्यंत हा मृतदेह कोणाचा त्याची कल्पना कोणालाही नसल्यामुळे देवबाग पंचायतीचे एक पंच देवराय सैल यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि अशा प्रकारची घटना घडली असून मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या ताब्यातून मुलाचा मृतदेह ताब्यात घ्यावा, असे आवाहन केले. त्यानंतर ज्योती पाटील यांचा मृतदेह देवबागजवळच हाती लागला. माता आणि मुलगा याचा मृतदेह मिळाल्यानंतर वडिलांचा शोध सुरु झाला.
पाडी येथे सापडला शामचा मृतदेह
गुरुवारी सकाळी कुंकळ्ळी पोलीस स्थानकात एक फोन आला. पाडी येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशा स्वरुपाचा तो फोन होता. घटनास्थळी पोलीस गेले तेव्हा मृतदेह झाडाला लोंबकळत असल्याचे पोलिसांनी पाहिले. पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह खाली उतरविला तेव्हा पोलिसांच्या संपर्कात विराज नाईक ही व्यक्ती आली आणि मयताची ओळख पटली. मयताचे नाव शाम पाटील असे असून आपण त्यांचा भाचा असल्याचे विराज नाईक यांनी सांगितले. पाडी येथे सापडलेला शाम पाटील यांचा मृतदेह सरकारी इस्पितळातील शवागृहात ठेवण्यात आला आहे. गुरुवारी शवचिकित्सा करण्यात आली नव्हती. आज शुक्रवारी सकाळी मृतदेहावर शवचिकित्सा करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आत्महत्त्या करण्याचा पाठविला मेसेज
बुधवारी 28 जून 2023 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास शाम पाटील जीए-08-एन-7559 क्रमांकाची कार घेऊन कारवारच्या दिशेने गेले. कारमध्ये शामसह त्याची पत्नी ज्योती व मुलगा दक्ष होता. कारवारहून गोव्यात परत येत असताना शाम यांनी आपल्या जवळच्या दोघांना ‘व्हॉयस मेसेज’ पाठवला. ‘आर्थिक विवंचनेमुळे आपल्या पत्नीने आणि मुलाने कारवारला आत्महत्या केलेली असून आपणही आता आत्महत्या करणार आहे’ असा तो संदेश होता.
झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास…
शाम पाटील हे सुरुवातीला वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते. अत्यंत कष्ट काढून त्यांनी या वसाहतीला लागणाऱ्या गरजा ओळखून त्या पुरवण्याचा व्यवसाय सुरु केला. कोरोनाच्या काळात मृत्यूच्या दाढेतून नशिबानेचे बाहेर आलेले, शांत स्वभावाचे व एक चांगले कंत्राटदार म्हणून नाव कमावलेल्या शाम पाटील यांना झटपट आणखी श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी आपल्या कुटुंबासह आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला.