वृत्तसंस्था /बेंगळूर
2023 च्या क्रिकेट हंगामातील येथे सुरु झालेल्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उत्तर विभागाने पहिल्या डावात 540 धावांचा डोंगर रचला. उत्तर विभागाच्या डावात ध्रुव शोरी, निशांत सिंधू आणि हर्षित राणा यांनी शानदार शतके झळकविली. गुरुवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर नॉर्थ-इस्ट विभागाने पहिल्या डावात 3 बाद 65 धावा जमविल्या होत्या. उत्तर विभागाने 6 बाद 306 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरुवात केली. 76 धावांवर खेळणाऱ्या निशांत सिंधूने 245 चेंडूत 3 षटकार आणि 18 चौकारांसह 150 धावा झोडपल्या. नारंगने 6 चौकारांसह 46 धावांचे योगदान दिले. नारंग आणि सिंधू यांनी 7 व्या गड्यासाठी 130 धावांची शतकी भागिदारी केली. कर्णधार जयंत यादव खाते उघडण्यापूर्वीच पायचीत झाला. निशांत सिंधू आणि हर्षित राणा यांनी 8 व्या गड्यासाठी 104 धावांची शतकी भागिदारी केल्याने उत्तर विभागाला 540 धावांपर्यंत मजल मारता आली. हर्षित राणाने 86 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद 122 धावा जमविल्या. उत्तर विभागाने 136 षटकात 8 बाद 540 धावांवर डावाची घोषणा केली. नॉर्थ-इस्ट विभागातर्फे लेमतूर, किशन सिंघा आणि पी. ज्योतीन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दिवस अखेर उत्तर विभागाने 20 षटकात 3 बाद 65 धावा जमविल्या होत्या. निलेश लामीचेनी 6 चौकारांसह 35 धावांवर खेळत आहे. कर्णधार जोनाथन 15 धावांवर पायचीत झाला.









