‘स्मायलिंग असॅसिन’…पॅट कमिन्स !
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचं स्मित लाघवी असलं, तरी त्याचा मारा मात्र त्याच्या उलट विलक्षण भेदक नि तिखट…कसोटीत शानदाररीत्या पदार्पण केल्यानंतर दुखापतींमुळं सलग 63 लढती गमवाव्या लागलेल्या या खेळाडूनं केलेल्या पुनरागमनाची अन् कांगारुंच्या माऱ्याचं घातक शस्त्र बनण्याबरोबरच संघाचं यशस्वीरीत्या नेतृत्व करण्यापर्यंत घेतलेल्या भरारीची कहाणी ही निश्चितच प्रेरणादायी…
नोव्हेंबर, 2011…वेगवान गोलंदाजांची दीर्घ परंपरा लाभलेल्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक ‘हिरा’ गवसल्याचं ‘त्यानं’ आपल्याच पहिल्या कसोटीत सिद्ध केलं…जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात हाशिम आमला, जॅक कॅलिस, ए. बी. डिव्हिलियर्ससारख्या दिग्गजांसह ‘त्यानं’ 79 धावांत चक्क 6 जणांना परतीची वाट दाखविली…त्यानंतर ‘तो’ क्रीझवर दाखल झाला तेव्हा मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कांगारुंना गरज होती अवघ्या 18 धावांची, पण पॅव्हिलियनमध्ये पोहोचले होते आठ गडी. खेरीज नवीन चेंडूवर तोंड द्यायचं होतं डेल स्टेन, फिलँडरसारख्या गोलंदाजांना. परंतु ‘त्या’ 18 वर्षीय खेळाडूनं मिशेल जॉन्सनच्या साथीनं न डगमगता खिंड लढविली आणि चौकार हाणून विजयाचं लक्ष्य पार केलं…
असं असूनही त्यानंतर ‘तो’ पुढची कसोटी खेळला तब्बल सहा वर्षांनी…याचं कारण खराब कामगिरी, गमावलेला फॉर्म होता असं वाटल्यास ते साफ चुकीचं. ‘त्याला’ ग्रासून टाकलं ते दुखापतींच्या ग्रहणानं…इतका मोठा काळ संघाबाहेर राहण्याची वेळ आल्यानंतर कुणीही खचून गेला असता. परंतु ‘त्यानं’ निर्धारानं बाहेर सरून ऑस्ट्रेलियाच्या माऱ्याचं प्रमुख हत्यार बनण्यापर्यंतच मजल मारली नाही, तर आज ‘तो’ चक्क त्या संघाचं नेतृत्व सांभाळू लागलाय…पॅट कमिन्स !
कमिन्स सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचे तत्कालीन प्रशिक्षक ट्रॉय कूली यांच्या नजरेत भरला तो 2010-11 च्या मायदेशातील 19 वर्षांखालील स्पर्धेतील त्याच्या वेगामुळं. त्यातच ग्रेग चॅपेलनी ‘हा मुलगा फलंदाजी करू शकतो, तो एक अष्टपैलू बनणार’, असं ट्रॉली यांना सांगून टाकलेलं…त्या उन्हाळ्यात आपल्या पहिल्याच ‘बिग बॅश’मध्ये न्यू साउथ वेल्सकडून खेळताना पॅटनं 11 बळी घेऊन गोलंदाजीत अव्वल स्थान पटकावलं. त्यापाठोपाठ ‘शेफिल्ड शिल्ड’मध्ये नऊ बळी…मग ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’सोबत केंद्रीय करार करणारा तो सर्वांत तऊण खेळाडू ठरला…
पण दुखापतींच्या ससेमिऱ्यानं पॅट कमिन्सच्या साऱ्या स्वप्नांवर पाणी फेरलं…त्यानं दक्षिण आफ्रिकेतील त्या पहिल्याच कसोटीत 44 षटकं टाकली. याची किंमत त्याला मोजावी लागली ती टाचेला झालेल्या ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’च्या रूपानं. बहुतेक षटकं त्यानं दुखावलेल्या पायानिशी टाकली अन् तशाच अवस्थेत फलंदाजीही केली. तऊण रक्त असल्यानं आपण काही आठवड्यांत यातून सावरून पुन्हा गोलंदाजी करू शकू असा हिशेब कमिन्सनं मांडला होता. प्रत्यक्षात त्याचा होरा साफ चुकला…
त्यानंतर एकही सामना न खेळता मोसम वाया जाणं अन् दर मोसमाच्या प्रारंभी त्यानं येऊन आपल्या ताज्या दुखापतीविषयी माहिती देणं हा जणू शिरस्ताच झाला…दक्षिण आफ्रिकेतील दुखापतीनंतर भर पडली ती 2012 सालच्या जूनमध्ये झालेल्या ‘साइड स्ट्रेन’ची. पाठोपाठ नोव्हेंबरमध्ये पाठीचा ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’. त्यानं ऑगस्ट, 2013 व सप्टेंबर, 2015 असं आणखी दोनदा डोकं वर काढलं…
मग ‘रिहॅब’ प्रक्रियेच्या जोडीला गोलंदाजीची धार न गमावता ती मजबूत करण्याच्या दृष्टीनं बदल करण्याचं आव्हान उभं झालं. याकरिता 2013-14 च्या उन्हाळ्यात कूली, ‘न्यू साऊथ वेल्स’चे प्रशिक्षक नि ‘फिजिओ’ यांच्या व्यतिरिक्त कमिन्सनं मदत घेतली ती स्वत: पाठीच्या दुखापतींवर मात केलेले महान वेगवान गोलंदाज डेनिस लीलींची. त्यासाठी त्यानं सिडनी ते पर्थ अशा थेड्या चकरा मारल्या नाहीत. लीलींनी त्याच्या गोलंदाजीच्या तसंच चेंडू टाकण्यासाठी धावून येण्याच्या शैलीत सुधारणा घडविल्या…यादरम्यान कमिन्स ऑस्ट्रेलियाच्या वतीनं इतर प्रकारांत खेळू लागला होता आणि 2015 पर्यंत तो एकदिवसीय सामन्यांसाठीच्या संघाचा नियमित सदस्यही बनला (2015 साली विश्वचषक जिंकलेल्या संघाचा तो भाग होता). पण कसोटी क्रिकेटसाठी शारीरिकदृष्ट्या तयार होण्यास एकदिवसीय लढतींमुळं जास्त वेळ लागला हे पॅट कमिन्स मान्य करतो…
2017 च्या मार्चच्या सुऊवातीला जवळपास सहा वर्षांनी आपली पहिली ‘शेफिल्ड शिल्ड’ लढत खेळताना कमिन्सनं आठ गडी टिपले. कसोटीत पुन्हा बोलवणं येण्याच्या दृष्टीनं हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा ठरला…त्यावेळी ऑस्ट्रेलिया चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात आली होती. बेंगळूर कसोटीनंतर मिचेल स्टार्कच्या उजव्या पायाला ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ झाल्याची बातमी आली अन् ‘शेफिल्ड शिल्ड’चा तो सामना संपल्यानंतर काही दिवसांतच पॅट कमिन्स रांचीला रवाना होण्यासाठी विमानात बसला…रांचीतील कसोटी बरोबरीत सुटली, तर धरमशालातील सामना जिंकून भारतानं मालिका खिशात घातली. पण दोन्ही ठिकाणच्या खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजीस पोषक नसताना देखील त्यानं प्रत्येक लढतीत 4 बळी मिळविले… 2017-18 ची ‘अॅशेस’ ही पॅट कमिन्सची घरच्या भूमीवरील पहिलीच मालिका होती. त्याच्याकडून अपेक्षा भरपूर होत्या अन् त्यानंही 23 बळी घेत निराश केलं नाही. शिवाय बऱ्यापैकी फलंदाजी करून अष्टपैलू म्हणून विकसित होण्याच्या आशा पल्लवित केल्या…पाठोपाठ आली गाजलेली दक्षिण आफ्रिकेतील मालिका. केप टाऊन कसोटीतील कुप्रसिद्ध ‘बॉल टॅम्परिंग’ प्रकरणानंतर तीन खेळाडूंची मायदेशी रवानगी झाली. त्यानंतर आधीच खचलेल्या ऑस्ट्रेलियाचा वाँडरर्स इथं झालेल्या अंतिम कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं 492 धावांनी धुव्वा उडवला खरा, पण त्यातही कमिन्सचं अर्धशतक आणि त्यानं 141 धावांत घेतलेले नऊ बळी उठून दिसल्याशिवाय राहिले नाहीत. पुढं काय होऊ घातलंय त्याची ही चुणूक होती… त्यानंतरच्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलिया ज्याच्यासाठी विख्यात आहे त्या लढाऊ वृत्तीचा पॅट कमिन्स पुरेपूर प्रतीक बनला. त्याचे संकेत त्यानं पुन्हा दिले ते विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दाखल झाल्यानंतर. 2018-19 मोसमातील ‘बॉर्डर-गावसकर’ चषक मालिकेत त्यानं 14 बळी घेतले अन् 163 धावाही केल्या. कमिन्सचे हे प्रयत्न फुकट गेले नाहीत आणि त्याला 2019 मध्ये इनाम मिळालं ते ऑस्ट्रेलिया संघाच्या उपकर्णधारपदाचं…2019 च्या ‘अॅशेस’ मालिकेत कमिन्सनं पाच कसोटींतून सर्वाधिक 29 बळी खात्यात जमा केल्यानंतर त्याचा दबदबा आणखी वाढला…या पार्श्वभूमीवर 2018 च्या सुऊवातीला ‘आयसीसी’ कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत 36 व्या स्थानावर असलेला पॅट फेब्रुवारी, 2019 येईस्तोवर जगातील अव्वल गोलंदाजाच्या स्थानावर आरुढ झाला…
2021-22 च्या ‘अॅशेस’ मालिकेपूर्वी वादात गुरफटलेल्या टीम पायनेनं कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नेतृत्व सोपवायचं कुणाकडे असा प्रश्न उभा राहिला. कारण स्टीव्ह स्मिथ आधीच ‘बॉल टॅम्परिंग’ प्रकरणामुळं बदनाम झालेला. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ला स्वत: दमदार कामगिरी करून इतरांना प्रेरित करणारा खेळाडू त्या जागी हवा होता. मग 2021 साली पॅट कमिन्स हा रे लिंडवॉलनंतरचा (1956) ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचं अधिपत्य करणारा दुसरा, तर गेल्या वर्षी एकदिवसीय चमूचं नेतृत्व करणारा पहिला जलदगती गोलंदाज बनला…
पॅट कमिन्ससमोर पहिलंच आव्हान आलं ते मायदेशातील ‘अॅशेस’चं आणि त्यात ऑस्ट्रेलियानं इंग्लंडला 4-0 अशी धूळ चारली. त्यानंतर पाकिस्तानात जाऊन ऐतिहासिक मालिका विजय मिळविला तसंच श्रीलंकेतील मालिका बरोबरीत सोडवली. घरच्या भूमीवर वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकण्याबरोबर कांगारुंनी 16 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर दक्षिण आफ्रिकेला मायभूमीतील कसोटी मालिकेत पराभूत करण्यात सुद्धा यश मिळविलं…यंदा भारतात येण्यापूर्वी कमिन्सच्या संघानं गमावली होती ती केवळ एक कसोटी. मात्र भारतीय दौऱ्यावर त्यांना सुऊवातीच्या दोन्ही लढती गमवाव्या लागल्या. त्यानंतर आई अत्यंत आजारी असल्यानं त्याला दौरा अर्धवट सोडून घरी परतावं लागलं…
आईला गमावण्याचं दु:ख पचवत परतलेल्या पॅट कमिन्सनं मग मिळविलं ते भारताला हरवून जागतिक कसोटी स्पर्धेचं जेतेपद अन् त्यानंतर जबरदस्तरीत्या किल्ला लढवत इंग्लंडमधील ‘अॅशेस’ मालिकेची पहिली कसोटी खिशात घालण्याचा पराक्रम…नेतृत्वाचा भार पेलतानाही त्यानं आपल्या कामगिरीवर परिणाम होऊ दिलेला नाही नि आपलं ते प्रसिद्ध स्मितही विरू दिलेलं नाही…शांतपणे वावरणाऱ्या, पराभवातही आपल्या खेळाडूंच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आणि विजेत्यांचं कौतुक करण्यास कंजुषी न करणाऱ्या कमिन्सचा वेगळेपणा ऑस्ट्रेलियाच्या एरव्हीच्या रांगड्या आणि आक्रमक बाजाच्या परंपेरत नेहमीच उठून दिसतो!
थोडक्यात कमिन्स…
- पूर्ण नाव : पॅट्रिक जेम्स कमिन्स…
- जन्म : 8 मे, 1993 (वेस्टमेड, सिडनी)
- उंची : 6 फूट 4 इंच
- कसोटी पदार्पण : 17 ते 21 नोव्हेंबर, 2011 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध…
- वनडे पदार्पण : 19 ऑक्टोबर, 2011 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध…
- टी 20 पदार्पण : 13 ऑक्टोबर, 2011 रोजी द. आफिक्रेविरुद्ध…
गोलंदाजीतील कारकीर्द…
- प्रकार सामने डाव बळी डावात सर्वोत्तम लढतीत सर्वोत्तम सरासरी 5 बळी 10 बळी
- कसोटी 52 94 225 23 धावांत 6 बळी 62 धावांत 10 बळी 21.9 8 1
- वनडे 75 75 124 – 70 धावांत 5 बळी 27.61 1 –
- टी20 50 50 55 – 15 धावांत 3 बळी 24.55 – –
खेळ जुनाच ओळख नवी ! जलतरण – ‘ब्रेस्टस्ट्रोक’
स्पर्धात्मक जलतरणाच्या चार प्रमुख शैलींपैकी ‘फ्रीस्टाईल’प्रमाणेच ‘ब्रेस्टस्ट्रोक’ हा आणखी एक प्रकार…‘फ्रंट क्रॉल’च्या विकासामुळे ‘फ्रीस्टाईल’ हा सर्वांत वेगवान जलतरण ‘स्ट्रोक’ बनून त्याने ‘ब्रेस्टस्ट्रोक’ला मागे टाकले असले, तरी त्याची लोकप्रियता कायम राहिली आहे. 1904 साली प्रथमच ऑलिम्पिकमध्ये वेगळ्या ‘ब्रेस्टस्ट्रोक’ शर्यतीचा समावेश केला गेला…
- ‘ब्रेस्टस्ट्रोक’ प्रकारात जलतरणपटू छाती पुढे काढून आणि तलावाच्या तळाच्या दिशेने तोंड करून पोहतो आणि यात धड फिरवता येत नाही. हात पाणी कापण्याचे काम करत असताना श्वास मिळविण्यासाठी डोके वर काढावे लागते. हात आणि डोके पाण्याखाली असताना पाय, जे नेहमीच पाण्याखाली असतात, ते ‘फ्रॉग किक’ करतात…
- या ‘स्ट्रोक’ला ‘फ्रॉग स्ट्रोक’ देखील म्हणतात. कारण पाय आणि हातांच्या हालचाली पोहणाऱ्या बेडकासारख्या असतात. ही सर्वांत कमी गतीची शैली असली, तरी पोहण्यासाठी सर्वांत कठीण आहे…
- ‘ब्रेस्टस्ट्रोक’च्या जलतरणपटूंनी कठोरपणे नियमांचे पालन करायचे असते. त्याअंतर्गत त्यांनी खांदे पाण्याच्या रेषेत ठेवायला हवेत आणि पाण्याखाली हात व पायांच्या हालचाली पुढे-मागे करायला हव्यात. परतीचे वळण घेतेवेळी आणि समाप्तीच्या प्रसंगी दोन्ही हातांनी एकत्र भिंतीला स्पर्श करणे आवश्यक असते…
- सुरुवातीस आणि पहिल्या स्ट्रोकच्या वेळी तसेच परतीचे वळण घेतल्यानंतर जलतरणपटूंना एका हाताने ‘स्ट्रोक’ आणि एका पायाने ‘किक’ मारण्यास परवानगी दिली जाते. इतर सर्व वेळा जलतरणपटूंनी डोके पाण्याच्या वर काढायचे असते. कोणत्याही ‘डॉल्फिन’, ‘सिझर’ किंवा ‘फ्लटर किक’ला परवानगी नसते…
- ‘ब्रेस्टस्ट्रोक’च्या इतिहासातील एक महत्त्वाचा बदल 1987 मध्ये होऊन त्यानुसार जलतरणपटूंना संपूर्ण ‘स्ट्रोक’च्या दरम्यान डोके संपूर्णपणे पाण्याच्या पृष्ठभागाच्या वर ठेवण्यास भाग पाडणारा नियम गुंडाळण्यात आला…
- 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघ म्हणजेच ‘वर्ल्ड अॅक्वेटिक्स’ने (पूर्वाश्रमीचे ‘फिना’) जलतरणपटूंना सुरुवातीस आणि प्रत्येक वळणानंतर एक ‘डॉल्फिन किक’ घेण्याची परवानगी दिली. ही पद्धत आता जवळजवळ सर्वत्र आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंकडून वापरली जाते…
- 1904 मध्ये प्रथमच ‘ब्रेस्टस्ट्रोक’ प्रकार ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट केला गेला तेव्हा 440 यार्डांच्या अंतराची फक्त एक पुऊषांची शर्यत होती. लंडनमधील 1908 च्या ऑलिम्पिकमध्ये पुऊषांच्या 200 मीटर्स ‘ब्रेस्टस्ट्रोक’ची शर्यत प्रथमच आयोजित करण्यात आली आणि तेव्हापासून ती प्रत्येक ऑलिम्पिकचा भाग राहिली आहे…
- पॅरिसमधील 1924 च्या ऑलिम्पिकपासून महिलांच्या 200 मीटर्स ‘ब्रेस्टस्ट्रोक’ शर्यतीने पदार्पण केले, तर 1968 च्या मेक्सिको सिटीमधील ऑलिम्पिकपासून ‘ब्रेस्टस्ट्रोक’ची 100 मीटर्स शर्यत देखील सुरू झाली…ऑलिम्पिकमध्ये ‘ब्रेस्टस्ट्रोक’च्या केवळ 100 मीटर्स आणि 200 मीटर्सच्या शर्यती होत असल्या, तरी जागतिक स्तरावरील आणि खंडाच्या पातळीवरील स्पर्धांत 50 मीटर्सची शर्यतही घेतली जाते…
– राजू प्रभू
माउंट मेरू मोहीम : पश्चिम बाजूने शिखर चढाईचा जगातील पहिला प्रयत्न
माऊंट मेरू म्हणजे अभेद्य पर्वत. आजपर्यंत अगदी बोटावर मोजण्याइतक्या शिखर चढाया या शिखरावर झाल्या आहेत. जेव्हा गीर्यारोहण जगत एव्हरेस्ट व इतर शिखरांवर चढाई करण्यात मग्न होतं, तेव्हा हाडाचे गीर्यारोहक मेरूचे आव्हान पेलत होते. मेरू शिखर चढाईचा प्रयत्न करणे, हे देखील मोहिमेचे यशच असते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या शिखराची पश्चिम बाजू त्यात आणखी अनवट. येथे याआधी कधीच चढाई झालेली नाही. मेरू शिखराच्या इतिहासात पश्चिम बाजूने शिखर चढाईचा पहिला प्रयत्न केला तो गिरिप्रेमीच्या संघाने! अवघ्या 400 मीटरहून शिखरमाथा हुकला मात्र इतिहासात नोंद घेतली जाईल अशी मोहीम गिरिप्रेमीच्या संघाने केली.
मेरूचा पौराणिक संबंध
समुद्र मंथनाच्या वेळी समुद्र घुसळविण्यासाठी वापरण्यात आलेला रवि हा मेरुदंड नावाने ओळखला जातो, हा मेरूदंड म्हणजे माऊंट मेरू. संस्कृत भाषेत पर्वताला मेरू असेच संबोधतात. गढवाल हिमालयात गंगोत्री परिसरात तपोवन भागामध्ये शिवलिंग, थलाई सागर, भ्रिगु पर्वत यांच्या साथीने माऊंट मेरूचे भव्यदिव्य रूप उठून दिसते.
मेरू शिखर समूह
तीन शिखरांचा समूह असलेल्या मेरू येथे दक्षिण शिखर 6660 मीटर उंच आहे, मध्य शिखर 6310 मीटर उंच आहे, तर उत्तर शिखर 6450 मीटर उंच आहे. यातील मध्य शिखरावरील चढाई अशक्यप्राय अवघड गणली जाते. आजपर्यंत येथे 20 हून अधिक वेळा चढाईचे प्रयत्न झाले मात्र केवळ चार वेळाच आजपर्यंत गीर्यारोहक चढाई करू शकले आहेत.
मोहिमेची सुरवात
गिरिप्रेमीच्या माऊंट मेरू मोहिमेची तयारी वर्षभर चालू होती, मात्र प्रत्यक्ष मोहिमेला सुरवात होण्याआधी आमचा मुक्काम होता उत्तरकाशी येथील प्रथितयश ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनियरिंग‘ येथे. सामानाची जुळवाजुळव व पुढील संपूर्ण मोहिमेचे नियोजन काटेकोरपणे तपासून आम्ही पुढे निघालो. गंगोत्री येथून ट्रेकला सुरवात होते. जेव्हा आम्ही गढवाल हिमालयात मोहीम आखतो, तेव्हा गंगोत्री येथे गंगामातेचे दर्शन घेतल्याशिवाय, सुरक्षित चढाई व यश यासाठी आम्ही मनोमन प्रार्थना करतो व पुढील प्रवासाला सुरवात करतो.
गंगोत्री-भोजबासा- तपोवन- कीर्ती बमक ग्लेशियर हा असा बेस कॅम्पपर्यंतचा संपूर्ण ट्रेक आहे. हा ट्रेक देखील एखाद्या मोहिमेसारखा भासतो. यावर्षी सतत होणारी हिमवृष्टी अन मुळात खडतर असलेली पायवाट यांमुळे नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा या ट्रेकमध्ये खर्ची पडली. तपोवनपर्यंत किमान काही गीर्यारोहक, ट्रेकर्स दरवर्षी येतात, तपोवनच्या पुढे मात्र जवळपास वीस वर्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतकी गीर्यारोहक-ट्रेकर मंडळी या वाटेवर ट्रेक करतात. त्यामुळे आम्हाला मार्ग शोधत, हवामानाचा अंदाज घेत पुढे जावे लागले. आमचा बेस कॅम्प हा हिमनदीवर स्थित होता. कीर्ती बमक नावाची हिमनदी ही थलाई सागर, शिवलिंग, भ्रिगु पर्वत, मेरू यांसारख्या शिखरांनी वेढलेली आहे. आम्ही जेव्हा बेस कॅम्पवर होतो तेव्हा या संपूर्ण हिमनदीवर सतत हिमवर्षाव होत असे. त्यामुळे आमच्या टेन्ट्सच्या बाजूने काही फूट हिम जमा होत असे. रोज या तीन फूट हिमांतून वाट काढत दिवसभराचे काम करावे लागत असे. साधे काही पावले चालणे थकवणारे असे, मात्र, जेव्हा आम्ही आमच्या चुहूबाजूंनी असलेले नितांत सुंदर पर्वत बघत असू, तेव्हा आमचा शीण क्षणार्धात नाहीसा होत असे.
माऊंट मेरूच्या पश्चिम बाजूनी आम्ही चढाई करण्याचे नियोजन केले होते. या बाजूने अजून एकदाही शिखर चढाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आमची शिखर चढाई हा जगातील पहिलाच प्रयत्न होता. माऊंट मेरूच्या चढाई मार्गामध्ये बेस कॅम्पनंतर अॅडव्हान्स बेस कॅम्प, कॅम्प 1 व शिखरमाथा असे नियोजन होते. या संपूर्ण मार्गावर दोरखंड बसवून मार्ग खुला करण्याचे आव्हान गिरिप्रेमीच्या गीर्यारोहकांनी व सोबत असलेला शेर्पा गीर्यारोहक मिंगमा शेर्पा यांनी पेलले. कॅम्प 1 च्या पुढे 70-80 अंशामध्ये खडी चढण आहे, येथे भूभागाला लागून टणक असा ब्लु आईस आहे व त्यावर हिमवृष्टीमुळे होणारा ठिसूळ प्रकारात गणला जाणारा हिम आहे. इतरवेळी या हिमाचे प्रमाण या दिवसांमध्ये कमी असते, म्हणून तांत्रिक चढाईसाठी आवश्यक असलेले रॉक पिटॉन्स येथे बसवता येतात व चढाई करण्यात त्याची मदत होते. यावेळी मात्र, सतत होणाऱ्या हिमवृष्टीमुळे हिमाचा थर वाढतच गेला, त्यामुळे ठिसूळ भागामध्ये रॉक पिटॉन्स बसवताना अनंत अडचणी आल्या. संघाने तब्बल तीन दिवस कॅम्प 1 वर अक्षरश: बसून काढले. मात्र निसर्गापुढे काहीच चालले नाही.
आमच्या संघाने तब्बल 6200 मीटर उंच चढाई केली होती. शिखरमाथा अवघ्या 400 मीटरवर असताना हवामानाने साथ न दिल्याने आम्हाला परतावे लागले. निसर्ग हा नेहमीच सर्वोच्च असतो, याची पुन्हा एकदा प्रचिती आली. कीर्ती बमक ग्लेशियर सोडताना भरून आले. लवकरच पुन्हा एकदा पुढील प्रयत्नासाठी परत येऊ, हाच निर्धार करून बेस कॅम्प आवरता घेत तपोवनच्या दिशेने परत निघालो.
– उमेश झिरपे









