आतिशी यांच्याकडे ‘अर्थ’बरोबरच महसूल खात्याचीही जबाबदारी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. आतिशी यांना अर्थ आणि महसूल विभागाचीही जबाबदारी देण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुऊंगात गेल्यानंतर कैलाश गेहलोत यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पही सादर केला होता मात्र आता वित्त आणि महसूल खात्याची जबाबदारीही आतिशी यांच्याकडे देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाशी संबंधित फाईल उपराज्यपाल विनय सक्सेना यांना पाठवण्यात आली होती. या फाईलवर स्वाक्षरी करत त्यांनी फेरबदलाला मंजुरी दिली आहे. नव्या बदलानुसार आतिशी यांच्याकडे आता एकूण 11 खाती आहेत. त्यांच्याकडे महिला आणि बालविकास, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, शिक्षण, कला संस्कृती आणि भाषा, पर्यटन, उच्च शिक्षण, प्रशिक्षण आणि तंत्रशिक्षण आणि जनसंपर्क आदी खाती यापूर्वीच सोपविण्यात आली होती. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वातील काही मंत्र्यांकडे 8 ते 9 खात्यांचा पदभार आहे. आम आदमी पक्षाचे दोन मोठे नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुऊंगात आहेत. अटकेमुळे दोघांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांना केजरीवाल मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
केंद्रीय मंत्रिमंडळातही फेरबदलांची चर्चा
योगायोगाने केंद्रीय मंत्रिमंडळातही लवकर फेरबदल होण्याची चर्चा आहे. बुधवारी रात्री उशिरा पंतप्रधान मोदींच्या घरी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पाच तासांहून अधिक वेळ चालली. तेव्हापासून मोदी मंत्रिमंडळातील फेरबदलाची अधिकच चर्चा जोर धरू लागली आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळात फेरबदल करून जातीय, सामाजिक आणि प्रादेशिक समीकरणे सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात, असे सूत्रांनी सांगितले.









