सचिन बरगे कसबा बावडा
सध्या लग्न समारंभात हळदी कार्यक्रम असो वा नवदाम्पत्याची वरात असो डीजेच्या दणदणाटात डॉन, चंद्रा अशा विविध गाण्यांवर तरुणाई थिरकताना पहायला मिळते. कसबा बावड्यात मात्र काही ठिकाणी आमदार सतेज पाटील यांच्या टोपण (बंटी) नावाने तयार केलेल्या डीजे गाण्यावर तरुणाई मनमुराद नाचताना पाहायला मिळते. यावरून आपल्या गावातील नेत्याबद्दल असणारी निष्ठा दिसून येते.
प्रसार माध्यमांमुळे सध्या सर्वच क्षेत्रातील माहिती त्वरित उपलब्ध होत असल्यामुळे सर्वसामान्याच्या ज्ञानात दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. त्यापैकीच एक म्हणजे राजकारणातील बदल तसेच राजकीय लोकांची लोकप्रियता याचा प्रभाव सामान्य नागरिकांवर (मतदारांवर) होताना दिसत आहे. राजकीय नेत्यांचा नागरिकांवर इतका प्रभाव पडला आहे की कसबा बावड्यातील रहिवासी असलेले माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार सतेज पाटील यांच्या टोपण (बंटी) नावाने तयार केलेले डीजे गीत सध्या लग्नसमारंभातील हळदी व वरातीमध्ये लावून तरुणाई आपल्या आनंदातही आपल्या घरच्या नेत्याला समाविष्ट करून घेताना दिसत आहे.
आमदार सतेज पाटील हे कसबा बावड्याचे सुपुत्र असून त्यांचा बावड्यातील जनतेवर आदरयुक्त प्रभाव आहे. ते सदैव बावडेकरांच्या सुखदुःखात सहभागी होत असल्याने बावड्यातील जेष्ठांसह शालेय विध्यार्थ्यांच्या चांगले परिचयाचे आहेत. कोणतीही निवडणूक असो बावडेकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. मग 2014 च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी लावणे असो किंवा 2019 च्या ‘आमचं ठरलंय’ म्हणत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला अप्रत्यक्षरीत्या मदत करून निवडून आणणे असो या सर्व घडामोडीत आमदार पाटील यांच्या प्रेमापोटी कसबा बावड्यातील मतदारांचा सिंहाचा वाटा होता. यावरून बावड्यातील जनतेचा आमदार पाटील यांच्या विषयी असलेली आस्था, आपुलकी आणि निष्ठा दिसून येते. याचाच एक भाग म्हणजे बावड्यात लग्न समारंभातील हळदी असो वा नव दाम्पत्याची वरात असो यामध्ये आमदार पाटील यांच्या (बंटी) टोपण नावाने तयार केलेल्या डीजे गाण्यावरही बावड्यातील तरुणाई थिरकताना दिसते.