पणजी : गोवा औद्योगिक विकास महामंडळ (आयडीसी) यांच्यातर्फे राज्यातील बांधकाम अभियंते आणि वास्तूरचनाकार यांच्यासाठी ‘बांधकाम आराखडा’ कार्यशाळा घेण्यात आली. दोनापावल येथील इंटरनॅशनल सेंटर गोवा या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यशाळेला प्रमुख पाहुण्या म्हणून उद्योग संचालिका श्रीमती श्वेतिका सचिन (आएएस), गोवा आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक, संस्थात्मक अभियंता विभागाचे अध्यक्ष अन्वर खान व राज्यातील सुमारे 70हून अधिक अभियंते आणि वास्तुविशारद उपस्थित होते.
श्रीमती श्वेतिका सचिन म्हणाल्या की, पुढील पाच-सहा महिन्यांत उद्योगंमधील बांधकामाशी संबंधित कामांसाठी आवश्यक असलेल्या मंजुरींच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या नियामक मान्यता प्रक्रियेमध्ये अधिक सुलभता, सुसूत्रता आणून त्या सोप्या केल्या जातील. यासाठी सुलभ व सकारात्मक सहयोगी महत्त्वाचा राहणार आहे. प्रक्रिया अधिक सुलभ बनवणे आणि मंजुऱ्यांमधील होणारा विलंब करमी करण्यासाठी कायदेशीर तरतुदींबाबतही सुधारणा करणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. गोवा आयडीसीने राबविलेल्या उपाययोजनांमुळे व्यावसायिकांना आता चांगला अनुभव मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही त्या म्हणाल्या. आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक म्हणाले, औद्योगिक कामांसाठी बांधकाम परवाना प्रक्रियेमध्ये सुलभता आणि सुसूत्रता आणत ऑगस्ट ते सप्टेंबर 2022 या काळाच्या तुलनेत गत सहा महिन्यांत म्हणजे जानेवारी ते जून या काळात आम्ही मान्यतादरामध्ये 124 टक्के वाढ साधण्यात यश मिळवले आहे. बांधकाम आराखड्यास नियामक मंजुरी प्रक्रियेतील बारकावे, योग्य सादरीकरणाची आवश्यकता यातील बारकावे वास्तुविशारद आणि अभियंत्यांसाठी जाणीवनिर्मिती करण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केल्याचेही त्यांनी संगितले. येत्या 4 ते 5 महिन्यांत बांधकाम परवाना प्रक्रिया पूर्णत: ऑनलाइन प्रणालीमध्ये आणणे हे आमचे ध्येय आहे, असेही ते म्हणाले.
कार्यशाळेत बांधकाम परवान्यांविषयी सादरीकरण…
या कार्यशाळेत बांधकाम मंजुऱ्या किंवा परवान्यांबद्दल माहिती देणारी विविध सादरीकरणे झाली. त्यानंतर प्रश्नोत्तरे सत्रामध्ये सखोल चर्चा करण्याबरोबरच शंकानिरसन करण्यात आले. औद्योगिक बांधकामांबाबत मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक, सरलीकृत करत या प्रक्रियेची माहिती व्हावी, यावर कार्यशाळेत भर देण्यात आला होता.









