शिक्षक अतिरिक्त ठरल्याने शिक्षण खात्याचा वेगळाच प्रताप
बेळगाव : उच्च प्राथमिक शाळांना आठवीचा वर्ग जोडण्यात आला. ज्याठिकाणी आठवीचा वर्ग जोडला गेला त्याठिकाणी नवीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. मराठी माध्यमाच्या शिक्षकांचीही नियुक्ती झाली. मात्र आता 9 शिक्षक अतिरिक्त झाले म्हणून त्यांची बदली चक्क कन्नड शाळांमध्ये करण्यात आली आहे. या शिक्षकांना कन्नडचा गंधही नाही. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना कसे शिकविणार? असा प्रश्न त्यांना पडला आहे. याप्रकरणी त्यांनी केएटी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. मराठी भाषिकांचे अस्तित्व संपविण्यासाठीच हा प्रकार करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिक्षकांची नियुक्ती करताना टीजीटी मराठी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना आता त्यांना कन्नड शाळांमध्ये नियुक्त करण्यात येत आहे. रामदुर्ग, सौंदत्ती याठिकाणी त्यांची नियुक्ती केली गेली आहे. हा एकप्रकारे अन्याय आहे. तेव्हा तातडीने लोकप्रतिनिधींनी याबाबत आवाज उठवावा, अशी मागणी हे शिक्षक करत आहेत. उच्च प्राथमिक शाळांना आठवीचा वर्ग जोडण्यात आला. त्यामुळे बीएससी-बीएड, बीए-बीएड अशा पदव्या घेतलेल्या शिक्षकांना त्याठिकाणी नियुक्त करण्यात आले. मात्र आता या उच्च प्राथमिक शाळांतील आठवीच्या वर्गात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे खानापूर आणि बेळगाव तालुक्यामध्ये एकूण 9 शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. ज्या मराठी शाळांमध्ये शिक्षक कमी आहेत त्याठिकाणी त्यांची नियुक्ती करणे गरजेचे होते. मात्र चक्क कन्नड शाळांमध्ये नियुक्ती करून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.
केएटी न्यायालयामध्ये शिक्षकांची धाव…
केएटी न्यायालयामध्ये याबाबत या शिक्षकांनी धाव घेतली आहे. त्याठिकाणी आपली बाजू मांडली जात आहे. मात्र अशाप्रकारे अन्याय होत असेल तर मराठी शिक्षकांनी करायचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूणच मराठी भाषिकांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, असा आरोप करण्यात येत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.









