11 दिवसांनंतरही पाणी नाही : तातडीने समस्या सोडविण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : सदाशिवनगरमध्ये तब्बल 11 दिवस पाणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांनी तक्रार केली. तक्रार केली असता पाणी सोडले. मात्र पाईप फुटल्यामुळे नळांना पाणीच आले नाही. त्यामुळे एलअॅण्डटी कंपनीच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाणीपुरवठा करताना दुजाभाव होत असल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. सदाशिवनगर येथे 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन घालण्यात येत आहे. मात्र ही पाईपलाईन घालताना जुनी पाईपलाईन फुटली आहे. दुरुस्ती न केल्यामुळे पाणी वाया जात आहे. अकरा दिवस पाणी आले नसल्यामुळे पाणीपुरवठा मंडळाकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर बुधवारी पाणी सोडले. मात्र पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी वाया गेले. याचबरोबर व्हॉल्वमनदेखील पाणीपुरवठा करताना दुजाभाव करत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. जाधवनगर परिसरात सात ते आठ तास पाणीपुरवठा केला जात आहे. तर सदाशिवनगरला केवळ दीड ते दोन तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सदाशिवनगरवासियांवर अन्याय होत असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.
कूपनलिका नसल्यामुळे टँकरवर अवलंबून
महत्त्वाचे म्हणजे सदाशिवनगर परिसरात विहिरी नाहीत. कूपनलिकांनाही पाणी नाही. त्यामुळे टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. टँकरला 1200 रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे. तेव्हा पाणीपुरवठा मंडळाने तातडीने पाईपची दुरुस्ती करून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोतिबा पाटील, के. एन. कार्लेकर, मनोहर नाईक, सचिन काकडे, प्रवीण कांबळे, गजू मोरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली आहे.









