सुनील छेत्रीचा 92 वा आंतरराष्ट्रीय गोल, स्वयंगोलमुळे भारताचा विजय हुकला
वृत्तसंस्था/ बेंगळूर
सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या गट अ मधील शेवटच्या साखळी सामन्यात भारताने कुवैतला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. अन्य एका सामन्यात नेपाळने पाकिस्तानचा एकमेव गोलने पराभव करून विजयी सांगता केले. प्रारंभापासूनच दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला आणि वादावादीचे प्रसंगही घडले. पूर्वार्ध संपण्याच्या सुमारास सुनील छेत्रीने शानदारी व्हॉलीवर गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली. त्याचा हा 92 वा आंतरराष्ट्रीय गोल होता. मात्र उत्तरार्धातील इंज्युरी टाईममध्ये अन्वर अलीने नोंदवलेल्या स्वयंगोलामुळे भारताला अखेर बरोबरीवर समाधान मानावे लागले. यामुळे गटात अग्रस्थान मिळविण्याचे भारताचे स्वप्नही भंगले.
भारताने वेगवान सुरुवात करीत कुवैतला अडचणीत आणले होते. नाओरेम महेश सिंगने आधीच्या सामन्यात पहिला आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला होता. डाव्या बगलेतून त्याने प्रतिस्पर्ध्यांवर खूपच दडपण आणले होते. पाचव्या मिनिटाला आकाश मिश्राकडून चेंडू ताब्यात घेत मध्यावर चेंडू पाठवला. पण तो सुनील छेत्रीच्या आवाक्याबाहेर गेला. संपूर्ण सामन्यात भारताने सेट पीसवर कुवैतला जेरीस आणले होते. महेशच्या कॉर्नरवर भारताला पहिली संधी मिळाली होती. कुवैतला हा चेंडू क्लीअर करता न आल्याने चेंडू अन्वर अलीच्या पुढ्यात पडला. पण त्याने मारलेला फटका लाईनवर व्यवस्थित थोपवण्यात आला. 14 व्या मिनिटाला संदेश झिंगानने कुवैतच्या ईद अल रशिदीला चॅलेंज केले. पण पंचांनी त्याला बुक करीत शनिवारी होणाऱ्या उपांत्य लढतीसाठी त्याला निलंबित करण्यात आले आहे.
कुवैतने हळूहळू नियंत्रण मिळविले आणि 20 व्या मिनिटाला त्यांना पहिली संधी मिळाली. पण त्यांच्या शबैब अल खाल्दीने मारलेला फटका क्रॉसबारवरून बाहेर गेला. पाच मिनिटानंतर अमरिंदर सिंगने अप्रतिम बचाव करीत मोहम्मद अब्दुल्लाहचा एक फटका दूर सारला. नंतर अन्वर अलीने थापाच्या कॉर्नरवर वाईड फटका मारला. पण पूर्वार्ध संपण्यास काही क्षण बाकी असताना सुनील छेत्रीने थापाच्या कॉर्नरवर साईड फुटेड व्हॉली मारत चेंडूला अचूक जाळ्याची दिशा दाखवत भारताला आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात कुवैतने जोरदार आक्रमण करीत भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर या सत्रावर भारताचेच वर्चस्व राहिले. 57 व्या मिनिटाला अल खाल्दीची फ्री किक अमरिंदरने बोटाच्या टिपने चेंडू बाहेर घालविला. या सत्रात भारताला काही संधी मिळाल्या. पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. सामना संपण्यास दहा मिनिटे असताना प्रशिक्षक स्टिमॅक यांना रेफरीशी वाद घातल्याबद्दल पुन्हा एकदा रेड कार्ड दाखविण्यात आले. बदली खेळाडू रोहित कुमारने एक संधी वाया घालविली तर अमरिंदरने 84 व्या मिनिटला आणखी एक अप्रतिम बचाव केला. यानंतर खेळाडूंत बाचाबाची झाल्याने हमद अल कलाफ व रहिम अली यांना रेड कार्ड दाखविण्यात आले. अब्दुल्लाह अल ब्लुशीचा निरुपद्रवी क्रॉसला अन्वर अलीने क्लीअर करण्याच्या नादात चेंडू आपल्याच जाळ्यात मारल्याने कुवैतला आयतेच बरोबरी साधून मिळाली आणि सात सामन्यांची क्लीन शीट मालिका खंडित झाली.