तलावात आढळले शिलालेख युक्त दोन स्तंभ
वृत्तसंस्था/ हैदराबाद
तेलंगणाची राजधानी हैदराबादनजीक 1 हजार वर्षे जुन्या जैन मूर्ती अन् शिलालेख सापडले आहेत. या मूर्ती आणि शिलालेख दोन वर्गाकृती (स्क्वेअर पिलर) स्तंभांमध्ये निर्माण करण्यात आले आहेत. हे स्तंभ हैदराबादनजीकच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील इनिकेपल्ली गावात सापडले आहेत. येथील एका तलावात हे दोन्ही स्तंभ होते. तलावातून हे स्तंभ बाहेर काढल्यावरच यासंबंधी पूर्ण माहिती मिळू शकणार आहे.
एक स्तंभ ग्रेनाइटचा तर दुसरा बेसॉल्टने तयार केलेला आहे. स्तंभाच्या चहुबाजूला 4 जैन तीर्थंकराच्या ध्यानमुद्रेतील मूर्ती आहेत. तर त्यावर कीर्तिमुख असल्याची माहिती प्रसिद्ध पुरातत्वतज्ञ ई. शिवनागी रे•ाr यांनी दिली आहे.
एक तरुण पुरातत्व तज्ञ आणि हेरिटेज अॅक्टिव्हिस्ट श्रीनाथ रेड्डीने या स्तंभांविषयी शिवनागी रेड्डी यांना कळविले होते. यानंतर शिवनागी यांनी इनिकेपल्ली गावचा दौरा केला आहे. दोन्ही स्तंभांवर तेलगू आणि कन्नड भाषेत शिलालेख आहेत. एका शिलालेखात जैन वस्तीबद्दल लिहिले गेले आहे. 9-10 व्या शतकात राष्ट्रकुटा आणि वेमुलावाडा चालुक्यात काळादरम्यान ते जैन धर्मीयांचे मोठे केंद्र होते असे रेड्डी यांच्याकडून सांगण्यात आले.
सुमारे 100 वर्षांपूर्वी जैन मंदिरातून या स्तंभांना आणत ते तलावात उभे करण्यात आले असावेत असे त्यांचे सांगणे आहे. मूर्तींचे पुरातत्व महत्त्व पाहत शिवनागी यांनी ग्रामस्थांना त्यांना सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.
तेलंगणाच्या यदाद्रि जिल्ह्यातील कोलनुपका गावात एक प्रसिद्ध जैन मंदिर आहे. हैदराबादपासून 77 किलोमीटर अंतरावरील हे मंदिर हजारो वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येते. तेलंगणात चौथ्या शतकात जैन धर्म अत्यंत प्रचलित होता असे मानले जाते. तेव्हा कोलनुपका याचे मोठे केंद्र राहिले असावे.









