मालवण : प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची जि. प प्राथमिक शाळेत कायम स्वरूपी दोन शिक्षक द्यावेत या मागणीसाठी ग्रामस्थांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचे आंदोलन छेडले असून आजही ही शाळा मुलांविना भरली. दोन शिक्षक नियुक्तीची मागणी पूर्ण न झाल्यास स्वातंत्र्यदिनी याच शाळेच्या ठिकाणी सर्व पालक काळे फिती बांधून मुलांच्या शैक्षणिक हक्कासाठी आमरण उपोषणास बसतील असा, इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
जि. प. शाळा तोंडवळी खालची येथील शाळेत शिक्षक पदे रिक्त असून दोन कायमस्वरूपी शिक्षक तात्काळ उपलब्ध करून द्यावेत या मागणीसाठी तोंडवळी खालची येथील ग्रामस्थांनी मालवण पंचायत समिती शिक्षण विभागवर शुक्रवारी धडक दिली होती . जोपर्यंत शाळेत कायमस्वरूपी दोन शिक्षक नियुक्त केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नाही अशी भूमिका तोंडवळी खालची ग्रामस्थ , पालकांनी घेतली होती. त्यानुसार शनिवारी या शाळेच्या पालकांनी व ग्रामस्थांनी मुलांना शाळेत पाठविले नव्हते. मात्र शनिवारी गटशिक्षणाधिकारी संजय माने यांनी ग्रामस्थांना तात्पुरत्या स्वरूपात सोमवारी एक शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल सोमवारी तालुका शिक्षण विभागाने या शाळेत एक कामगिरीवर शिक्षक पाठविला. मात्र उपस्थित पालक व ग्रामस्थांनी दोन कायमस्वरूपी शिक्षकाची मागणी करून आजही मुलांना शाळेत पाठवले नव्हते. पालकांनी हीच भूमिका आजही कायम ठेवत मुलांना शाळेत पाठविले नाही.
दरम्यान, याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक होत दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. कायमस्वरूपी शिक्षक न मिळाल्यास या शाळेतील पुढील शिक्षण पूर्णपणे नष्ट होण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. शिक्षक न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी शाळेच्या परिसरात पालक काळ्या फिती लावून आमरण उपोषणास बसतील असा इशारा तालुका प्रशासन व शिक्षण विभागाला देण्यात आला आहे.









