‘तरुण भारत’ वृत्ताची दखल : आज-उद्या रेल्वे सोडणार : वारकऱ्यांमधून समाधान
बेळगाव : पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी वारीसाठी नैऋत्य रेल्वेने 28 व 29 रोजी हुबळी ते पंढरपूर या मार्गावर यात्रा स्पेशल एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘तरुण भारत’ने वारकऱ्यांची मागणी लावून धरल्याने अखेर नैऋत्य रेल्वेला बातमीची दखल घेत उाशीरा का होईना परंतु हुबळी-पंढरपूर मार्गावर एक्स्प्रेस सोडावी लागली. पंढरपूर मार्गावर एक्स्प्रेस सोडल्याने वारकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. नैऋत्य रेल्वेकडून दरवर्षी पंढरपूर येथील यात्रेसाठी एक्स्प्रेस सोडली जाते. पंरतु यावर्षी यात्रा दोन दिवसांवर आली तरी रेल्वे सोडण्यात आली नाही. हजारो वारकरी बेळगाव ते मिरज व तेथून पंढरपूर गाठत होते. त्यामुळे हुबळी ते पंढरपूर थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती. तरुण भारतने वारकऱ्यांची ही मागणी लावून धरली. त्यामुळे नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाला अखेर एक्स्प्रेस सोडावी लागली. सकाळी 7 वाजता हुबळी येथून निघालेली एक्स्प्रेस सकाळी 9.45 वाजता बेळगाव तर सायंकाळी 4.40 वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे. तर परतीच्या मार्गात सायंकाळी 5.55 वाजता पंढरपूर येथून निघालेली एक्स्प्रेस रात्री 12.30 वाजता बेळगावला तर रात्री 3.45 वाजता हुबळी येथे पोहोचेल. एक्स्प्रेसला धारवाड, अळणावर, लोंढा, खानापूर, बेळगाव, सुळेभावी, सुळधाळ, पाश्चापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचणी, कुडची, उगारखुर्द, शेडबाळ, विजयनगर, मिरज व सांगोला असे थांबे देण्यात आले आहेत. यामुळे वारकऱ्यांची पंढरपूर दर्शनाची सोय होणार आहे.









