मोफत बसप्रवास सुसाट : आंतरराज्य प्रवासासाठी काढावा लागणार बसपास
बेळगाव : शासनाने महिलांसाठी सार्वजनिक बसमध्ये मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याबरोबरच आता विद्यार्थिनींना शून्य तिकीट बस प्रवास करता येणार आहे. जुना बसपास किंवा प्रवेश शुल्क भरणा पावती दाखवून या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थिनींचा प्रवास सुसाट होणार आहे. 11 जूनपासून राज्यात महिलांना मोफत बस प्रवास उपलब्ध करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थिनींच्या मोफत बस प्रवासाविषयी संभ्रम निर्माण झाला होता. अखेर परिवहनने विद्यार्थिनींनाही शून्य तिकीट बस प्रवास सेवा उपलब्ध केली आहे. त्यामुळे विद्यार्थिनींचा दैनंदिन प्रवास सुखकर झाला आहे.
विद्यार्थ्यांना सेवा सिंधू पोर्टलच्या माध्यमातून स्मार्ट बसपास वितरित केले जात आहेत. बेळगाव विभागात दरवर्षी 76 हजारहून अधिक विद्यार्थी बसपास मिळवितात. मात्र, यंदा विद्यार्थिनींना मोफत बसपासची सुविधा उपलब्ध करून दिल्याने केवळ विद्यार्थी बसपास काढणार आहेत. त्यामुळे बसपास घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होणार आहे. बसपास काढण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सेवासिंधू पोर्टलवर अर्ज केल्यानंतर शक्ती योजनेची संपूर्ण माहिती मिळणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना राज्यांतर्गत प्रवासासाठी बसपास काढणे अनिवार्य आहे. विद्यार्थिनी जुन्या बसपासवर नमूद केलेल्या मार्गावरच शून्य तिकीटाद्वारे विनामूल्य प्रवास करू शकतात. परिवहन मंडळाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिला जातो. शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसपास प्रक्रियेला प्रारंभ होतो. मात्र दोन वर्षांपासून बसपास प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतरच बसपास उपलब्ध होऊ लागले आहेत. ही प्रक्रिया किचकट आणि डोकेदुखी असल्याने विद्यार्थ्यांचेदेखील हाल होऊ लागले आहेत. यंदा विद्यार्थिनींना मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बसपासच्या त्रासातून विद्यार्थिनी मुक्त झाल्या आहेत. शिवाय मोफत प्रवासामुळे विद्यार्थिनींना पैशाची बचत होणार आहे.
सीमाभागातील विद्यार्थिनींची गैरसोय
कर्नाटकातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींना हा शून्य तिकीट प्रवास लागू नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना बसपास काढूनच प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे सीमाभागातील शेकडो विद्यार्थिनींची गैरसोय होणार आहे. शिक्षणासाठी महाराष्ट्रात जाणाऱ्या विद्यार्थिनींना बसपाससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्याबरोबरच कर्नाटकात येणाऱ्या विद्यार्थिनींनाही बसपास काढूनच प्रवास करावा लागणार आहे.
के. के. लमाणी (डीटीओ परिवहन)
विद्यार्थिनींना शून्य तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना ये-जा करणे सोयीस्कर होणार आहे. मात्र आंतरराज्य प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना ही सुविधा उपलब्ध नाही. त्यांनी बसपास काढूनच प्रवास करावा. राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना शून्य तिकीट सुविधा उपलब्ध आहे.