केएससीए 16 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक 16 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लक्ष्य क्रिकेट अकादमी संघाने एसडीएमसी धारवाड संघाचा 7 गड्यांनी, हुबळी स्पोर्ट्स क्लब संघाने विजय क्रिकेट अकादमी ब संघाचा 267 धावांनी तर तेजल शिरगुप्पी क्रिकेट अकादमी संघाने कर्नाटका स्टार स्पोर्ट्स संघाचा 105 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. सुप्रित नेजी, संकेत शेट्टी, शतकवीर साईनाथ राजोली यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात तेजल शिरगुप्पी क्रिकेट अकादमी हुबळी संघाने प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकात सर्व गडी बाद 206 धावा केल्या. त्यात साईनाथ राजोलीने 1 षटकार, 11 चौकारांसह 142 धावा करीत दमदार शतक झळकविले. त्याला वैभव व्ही. के. ने 3 चौकारांसह 17 तर शुभ सी. एम. 16 धावा करुन सुरेख साथ दिली. कर्नाटक स्टार स्पोर्ट्सतर्फे सुपर्श एस. करणेने 56 धावात 4, आरूश दिक्षितने 14 धावात 3, हित पटेलने 44 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्नाटक स्टार स्पोर्ट्स अ संघाचा डाव 29.4 षटकात सर्व गडी बाद 101 धावात आटोपला. त्यात प्रितम जोशीने 6 चौकारांसह 37, विश्वासने 12 धावा केल्या. तेजलतर्फे साईनाथ राजोलीने 9 धावात 4, शुभ सी. एम. ने 21 धावात 3, आदीत्य डी. ने 15 धावात 2 गडी बाद केल्या.
दुसऱ्या सामन्यात हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी बाद 297 धावा केल्या. त्यात विजय बांडेने 13 चौकारांसह 83, संकेत शेट्टीने 10 चौकारांसह 78, मनिष निंगनुरने 5 चौकारांसह 44, विकास पाटील व हर्ष आर. एस. यांनी प्रत्येकी 20 तर यश ठाकुरने 14 धावा केल्या. विजया अकदामीतर्फे परिक्षीतने 31 धावात 3, आरूश 53 धावात 3, नागराजने 59 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना विजया अकादमीचा डाव 13.3 षटकात 30 धावात गारद झाला. त्यात नागराजने 11 धावा केल्या. त्याच्या व्यतिरीक्त एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. हुबळी स्पोर्ट्सतर्फे संकेत शेट्टीने 12 धावात 6 गडी बाद करून निम्म्याहून अधिक संघ गारद केला. त्याला विकास पाटील व हर्षिद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद करून सुरेख साथ दिली. दुसऱ्या सामन्यात एसडीएमसी धारवाड संघाने प्रथम फंलदाजी करताना 37.4 षटकात सर्व गडी बाद 121 धावा केल्या. त्यात सिद्धार्थने 7 चौकारांसह 48, मुशाहीद बालभट्टाने 17, सुदर्शन कुरबागीने 15 तर प्रणव शेट्टीने 13 धावा केल्या. लक्ष्य क्रिकेट अकादमीतर्फे झेकवान पटेलने 15 धावात 3, अवनिश नाविलकरने 37 धावात 3, रूपवीर खोजलगीने 17 धावात 2 तर प्रतिकने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना लक्ष्य क्रिकेट अकादमी संघाने 27.2 षटकात 3 गडी बाद 125 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात सुप्रित नेजीने 11 चौकारांसह नाबाद 58, समर्थ कांबळेने 15 तर अर्थव मानेने 11 धावा केल्या. एसडीएमसीतर्फे मुशाहीद व समृद्ध यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









