गतवर्षी सत्तरीत धबधब्यांवर बुडाले आठजण : यंदाही सुरुवातीलाच शिवकुमारचा बळी
वाळपई : पावसाळा जोरदारपणे सुरू झाल्याने सत्तरी तालुक्यातील नद्यांचे प्रवाह सुरू झालेले आहेत. त्यामुळे नद्यांवर व धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी होणार आहे. दारू पिऊन दंगामस्ती करण्याचे प्रकार वाढत जातात आणि परिणामी अनेकांच बुडून मृत्यू होतो. गेल्या वर्षी तालुक्यात असे आठ जणांचे बुडून बळी गेले होते. यंदाही सुरुवातीलाच वेळगे सत्तरी येथील नदीत आंघोळ करताना बेती – बार्देश येथील शिवकुमार पवार याचा बळी गेला. त्यामुळे सध्याच्या पावसाळ्यात अशाप्रकारे बळी जाऊ नये, म्हणून सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे. शिवकुमार पवार याचा बळी जाण्याची घटना रविवारी घडली होती. काल सोमवारी दुपारी शिवकुमार पवार याचा मृतदेह सापडला. वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.
‘राजग्याची कोण’ येथे बुडाला शिवकुमार
बेती येथील शिवकुमार पवार व इतर चार मित्र सत्तरी तालुक्यातील धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी आले होते. मात्र धबधबे प्रवाहित झालेले नाहीत. यामुळे त्यांनी आपला मोर्चा वेळगे सत्तरी येथील ‘राजग्याची कोण’ या ठिकाणी वळविला. दुपारी तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी नदीच्या पात्रात उतरून आंघोळीचा आनंद घेतला. मात्र सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यातील शिवकुमार पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळपासून शिवकुमारचा शोध घेण्यात आला. दुपारी अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली बोटीचा वापर करून मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
गेल्यावर्षी बुडाले होते आठजण
गेल्या वर्षी सत्तरी तालुक्यातील धबधबे व नदीच्या पात्रात आंघोळ करताना बुडून 8 जणांना मृत्यू आला होता. कुमठोळ येथील धोकादायक धबधब्यावर एकाच वेळी वास्को येथील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यंदा सध्या पावसाळा सुरू झाला असून शिवकुमार पवार हा यंदाच्या पावसाळ्यातील पहिला बळी ठरलेला आहे.
धबधब्यावर जाताय सावधान : गावस
अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांनी नदीवर किंवा धबधब्यांवर आंघोळीसाठी जात असाल तर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सुऊवातीच्या पावसामध्ये धबधब्याच्या प्रवाहातून दगड, धोंडे खाली पडण्याची शक्यता असते. त्यामुळे धबधब्यांवर आंघोळ करण्यासाठी गेल्यास धोका असतो, हे अगोदर लक्षात ठेवायला हवे. दारू पिऊन धबधब्यांच्या परिसरातील धोकादायक ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नामुळे अनेकजण बळी जातात. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे, असे गावस यांनी सांगितले. दरम्यान मयत शिवकुमार पवार याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर वाळपई पोलिसांनी प्रकरणाचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आलेला आहे. या संदर्भात पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर पुढील तपास करीत आहेत.









