13-15 ग्राम पंचायतींच्या कामगारांमुळे स्वच्छता मोहीम जोमात
बेळगाव : मागील काही वर्षात जिल्ह्याने उद्योग खात्री योजनेतून उद्दिष्टापेक्षा अधिक कामे केली आहेत. मात्र, आता दोन वर्षांपासून सरकारकडून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. यावर्षी मार्कंडेय नदीच्या स्वच्छता मोहिमेला गती देण्यात आल्याने बऱ्याच अंशी कामगारांना काम मिळत आहे. उद्योग खात्री योजनेतून या कामांना गती देण्यात आली आहे. तब्बल 13 ते 15 ग्राम पंचायत हद्दीतील कामगारांना काम देण्यात येत असून दररोज 13 हजारांहून अधिक कामगारांना काम मिळत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. उद्योग खात्री योजनेतून तलाव, नदी, नाले यांच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. नवीन तलावांच्या निर्मितीसाठीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. तालुका व जिल्हा पंचायतींच्या माध्यमातून मार्कंडेय नदीच्या पुन:श्चेतनाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात काम देण्यात येत आहे. तब्बल 25 कि.मी. पर्यंत नदीची स्वच्छता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ता. पं. च्या माध्यमातून दररोज 12 ते 13 हजार कामगारांना काम देण्यात येत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
काम देण्यामध्ये बेळगाव तालुका अव्वल
दोन-तीन वर्षांपासून उद्योग खात्री योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत होती. मात्र, यावर्षी कामगारांना काम देण्यामध्ये बेळगाव तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग सुरू केला आहे. तालुक्यात प्रभावीपणे ही योजना राबविली जात आहे. तालुक्यात कोट्यावधी ऊपयांची कामे करण्यात आली आहेत. अनेक कामगारांना काम देण्यासाठी अधिकाऱ्यांना कसरत करावी लागत होती. आता मार्कंडेय नदीच्या कामाला चालना देण्यात आल्याने कामगारवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी
तलाव, स्वच्छ भारत अभियान, रस्ते, गटारी यासह इतर कामांचा या योजनेत समावेश आहे. सध्या मार्कंडेय नदीच्या कामामुळे अनेक कामगारांना काम देण्यात येत आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी मार्कंडेय नदीचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता बऱ्यापैकी कामे झाली आहेत, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. नदीच्या होत असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी वारंवार अधिकारी भेटी देत आहेत. पावसाळ्यापूर्वी हे काम संपल्यास याचा फायदा नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. याचबरोबर सध्या मार्कंडेय योजनेंतर्गत बिजगर्णी, बेळगुंदी, तुरमुरी, बेकिनकेरे, उचगाव, बेनकनहळ्ळी, सुळगा (हिं.), कडोली, काकती, केदनूर, बंबरगा, कंग्राळी के. एच., कंग्राळी बुद्रुक, अगसगा, आंबेवाडी, होनगा या गावांतील नरेगा योजनेतील कामगारांना काम देण्यात येत आहे. इतर ग्राम पंचायतींच्या कामगारांनाही या ठिकाणी काम मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









