वृत्तसंस्था /नवी दिल्ली
बेंगळूरमध्ये 28 जूनपासून सुरु होणाऱ्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचे फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव हे पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विंडीजच्या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघामध्ये पुजारा आणि सूर्यकुमार यांना वगळण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघ विंडीजच्या दौऱ्यावर जाणार असून भारतीय कसोटी संघामध्ये यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेत पश्चिम विभाग संघ हा विद्यमान विजेता असून त्यांना यावेळी या स्पर्धेत थेट उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. मध्यविभाग व पूर्वविभाग यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजयी संघाबरोबर पश्चिम विभागाचा उपांत्य सामना 5 जुलैला खेळविला जाणार आहे. भारतीय कसोटीवीर चेतेश्वर पुजाराने आपल्या वैयक्तिक कसोटी कारकिर्दीत 103 सामन्यात 43.60 धावांच्या सरासरीने 7195 धावा जमविल्या असून त्यामध्ये 19 शतके व 35 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 206 ही पुजाराची सर्वोत्तम कामगिरी आहे. मुंबईच्या सूर्यकुमार यादवने गेल्या फेब्रुवारीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपले कसोटी पदार्पन केले होते. पण त्यानंतर त्याला या मालिकेतील उर्वरित सामन्यात संघात संधी मिळू शकली नाही.









