पाकिस्तानवर बरसले संरक्षणमंत्री
वृत्तसंस्था /जम्मू
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी जम्मू येथील सुरक्षा संमेलनात भाग घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा नेहमीच भारताचा हिस्सा राहिला आहे. तेथील लोक आता भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. पीओकेत पाकिस्तानच्या सरकारकडून अत्याचार केले जात असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. जम्मू-काश्मीरचा एक मोठा हिस्सा पाकिस्तानच्या कब्जात आहे. तेथील लोक आता भारतातील शांतता अन् समृद्धी पाहत आहेत. पाकव्याप्त काश्मीवर अवैध कब्जा केल्याने तो भाग पाकिस्तानच्या मालकीचा होणार नाही. भारताच्या संसदेत पीओकेवरून एक सर्वसंमत प्रस्ताव असून त्यानुसार पीओके हा भारताचाच भूभाग असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारत आता संरक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही विविध शस्त्रास्त्रs आणि दारूगोळ्याची निर्मिती करत आहोत. दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा रोखून आम्ही दहशतवाद्यांचे जाळे नष्ट करत आहोत. दहशतवादाबद्दल आमची भूमिका अत्यंत कठोर असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांच्यातील चर्चेनंतर जारी करण्यात आलेले संयुक्त वक्तव्य पाहता पाकिस्तानला निश्चितच झोंबले असेल. काश्मीरचा राग वारंवार आळवून पाकिस्तानला काहीच साध्य करता येणार नसल्याचे तेथील सरकारला बजावू इच्छितो. पाकिस्तानने स्वत:चे घर सांभाळावे. तेथील स्थिती पाहता काहीही घडल्यास आश्चर्य वाटू नये असे म्हणत संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले आहे.
370 हटविणे देशासोबत न्याय
कलम 370 हटविणे हा देशासोबत न्याय आहे. आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने विकास करत आहोत. दहशतवादाचा खात्मा करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. खोऱ्यात दहशतवादाचा वापर राजकारणासाठी होत असून हा प्रकार संपविला गेला पाहिजे, असे राजनाथ सिंह म्हणाले.









