भारताविरुद्ध पाकिस्तानी सैन्याला चीनची मदत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पीओकेमध्ये आपल्या कारवाया वाढवण्यासाठी आणि भारताला वेढा घालण्यासाठी चीन पाकिस्तानला अनेक मार्गंनी मदत करत आहे. पाकिस्तानबरोबरच आता चीनही नियंत्रण रेषेवर (एलओसी) संरक्षण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात गुंतला आहे. चीन पाकिस्तानला केवळ ड्रोन आणि लढाऊ विमानेच देत नाही तर कम्युनिकेशन टॉवर्स उभारण्यात आणि नियंत्रण रेषेजवळ भूमिगत केबल टाकण्यातही मदत करत असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. तसेच चीनचे सैनिक आणि अभियंते पाकिस्तानी लष्कराला नियंत्रण रेषेवर भूमिगत बंकर बांधण्यात मदत करत असल्याचेही निदर्शनास आल्यामुळे भारत सतर्क झाला आहे.
चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) आणि जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकामाअंतर्गत चीन पाकिस्तानला मदत करत असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बंकर्स आणि बोगदे निर्मितीमध्येही चीन पाकिस्तानला मदत करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चिनी तज्ञ पीओकेमधील लिपा खोऱ्यात काही बोगदे खोदत आहेत. तसेच, काराकोरम महामार्गापर्यंत पोहोचता यावे यासाठी विशेष मार्गिकाही तयार केली जात आहे. पाकिस्तानी लष्कराने अधिकृतपणे याबाबत मौन पाळले असले तरी गुप्तचर यंत्रणांना याबाबत माहिती मिळत आहे. पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र असल्याचा दावा करत चीनने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढवला आहे. पीओकेमध्ये भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करून चीनने 2014 मध्ये सीपीईसी प्रकल्प सुरू केला होता. काराकोरम महामार्गाचा विस्तार करण्याव्यतिरिक्त चीनने आपल्या जलविद्युत प्रकल्प आणि इतर प्रकल्पांच्या संरक्षणासाठी 36,000 सुरक्षा कर्मचारी पाठवले होते. अलीकडेच नियंत्रण रेषेजवळ काही ठिकाणी चिनी बनावटीचे 155 मिमी ट्रक-माउंटेड हॉवित्झर एसएच-15 दिसले. गेल्या वषी पाकिस्तान डे परेडमध्येही त्याचा समावेश करण्यात आला होता. जानेवारी 2022 मध्ये चीनने पाकिस्तानसोबत या 236 तोफांसाठी करार केला होता. पाकिस्तानने एसएच-15 तोफांच्या पुरवठ्यासाठी चीनी कंपनी नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप कॉर्पोरेशनशी करार केला होता. याअंतर्गत या तोफांच्या पहिल्या तुकडीअंतर्गत जानेवारी 2022 मध्ये 236 तोफांचे वितरण करण्यात आले.









