केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले प्रत्युत्तर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतातील मुस्लिमांच्या सुरक्षेवरून केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निशाणा साधला आहे. बराक ओबामा यांची टिप्पणी हैराण करणारी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना ओबामा हे भारतीय मुस्लिमांबद्दल बोलत होते. ओबामा यांच्या अध्यक्षकाळात 6 मुस्लीमबहुल देशांवर 26 हजारांहून अधिक वेळा बॉम्बवर्षाव करण्यात आला होता. अशा स्थितीत लोक ओबामांच्या आरोपांवर विश्वास कसा ठेवणार असे प्रश्नार्थक विधान सीतारामन यांनी केले आहे. आमचे सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ तत्वावर काम करत असून कुठल्याही समुदायासोबत भेदभाव केला जात नसल्याचे पंतप्रधानांनी अमेरिकेत स्पष्ट केले. पंतप्रधान मोदींना आतायर्पंत 13 देशांचे सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले असून यातील 6 पुरस्कार हे मुस्लीमबहुल देशांकडून देण्यात आले आहेत असे सीतारामन म्हणाल्या. अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्याची संधी अत्यंत कमी लोकांना मिळते. पंतप्रधान मोदींना अमेरिकेतील दोन्ही पक्षांकडून आमंत्रित करण्यात आले होते. अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत योगसराव करण्यासाठी सुमारे 135 देशांचे प्रतिनिधी एकत्र झाले होते. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात योग आता पूर्ण जगात लोकप्रिय ठरत असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याने भारत आणि अमेरिका दोघांच्या भागीदारीला नवी उंची मिळणार आहे. तर ओबामा यांचे वक्तव्य हे भारतातील वातावरण जाणूनबुजून बिघडविण्यासाठी करण्यात आल्याचे माझे मानणे आहे. परंतु नरेंद्र मोदींच्या विकासात्मक धोरणांवर अशाप्रकारच्या कृतींमधून विजय मिळविता येणार नसल्याचा दावा सीतारामन यांनी केला आहे.
ओबामांचे वक्तव्य
अमेरिकेच्या अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीदरम्यान हिंदु बहुसंख्याक असलेल्या भारतातील मुस्लीम अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा उल्लेख करावा. जर तुम्ही भारतात वांशिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण न केल्यास भारत एका क्षणाला एकाकी पडण्यास सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे पंतप्रधान मोदींशी संभाषण झाल्यास सांगू इच्छितो असे ओबामा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.









