बेलारुसच्या राष्ट्राध्यक्षांची मध्यस्थी : रक्तपात टाळण्यासाठी माघार घेतल्याचा दावा
वृत्तसंस्था /मॉस्को
रशियातील वॅगनर समूहाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांनी सुरू केलेल्या सत्तापालटाच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी प्रिगोझीन आणि रशियन सरकार यांच्यात यशस्वी मध्यस्थी केली आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात बंड करणाऱ्या वॅगनरच्या खासगी सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांनी आपल्या सैनिकांना माघारी फिरण्याचे आदेश दिले आहेत. रशियन सरकार आणि प्रिगोझीन यांच्यात एक करार झाला असून त्याअंतर्गत रशिया प्रिगोझीनवरील सर्व आरोप मागे घेणार आहे. आरोप मागे घेण्याची तयारी दर्शवल्यानंतर प्रिगोझीनने सत्तापालटाचा प्रयत्न थांबवला आहे. द्वयींमधील कराराची सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र, प्रिगोझीन बेलारुसला जाणार असल्याची चर्चा सध्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. तसेच बंडखोरी प्रकरणात येवगेनी प्रिगोझीनवरील आरोप वगळले जातील आणि त्याच्याशी सामील झालेल्या सैनिकांवर कारवाई केली जाणार नाही. याव्यतिरिक्त, उठावात भाग घेतलेल्या सैनिकांना रशियन सैन्यात सामील होण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्याची संधी दिली जाईल, असे काही करार झाल्याचेही बोलले जात आहे.
मॉस्को मोहीम थांबवली
रशियाच्या दक्षिणेकडील रोस्तोव्ह शहराचा ताबा मिळवल्यानंतर खासगी लष्करी कंपनी वॅगनर ग्रुपने शनिवार, 24 जून रोजी मॉस्कोच्या दिशेने कूच केले होते. पण एका दिवसातच वॅगनर ग्रुपने मॉस्को मोहीम थांबवत असल्याची माहिती दिली आहे. माघारीची तयारी दर्शवताना वॅगनर समुहाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार ‘रक्तपात होऊ शकतो, म्हणून एका बाजूने आम्ही आक्रमक पवित्रा रोखण्याची जबाबदारी स्वीकारली. आम्ही आमच्या सैन्याला माघारी बोलावले असून ठरल्याप्रमाणे फील्ड पॅम्पमध्ये परत जात आहोत’ असे त्यांनी स्पष्ट केले.
बंड करण्यामागील मुख्य कारण
युव्रेनमधील बाखमुत येथे एका खासगी सैन्य प्रशिक्षण शिबिरावर क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशिया आणि वॅगनर यांच्यातील वादाला सुऊवात झाली. प्रिगोझीनने युव्रेनमधील वॅगनर प्रशिक्षण तळावर क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी व्रेमलिनला जबाबदार धरले होते. या हल्ल्यात बरेच सैनिक मारले गेल्यानंतर वॅगनर समूहाच्या प्रमुखाने बदला घेण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार दोन दिवसात वॅगनर समुहाने दोन शहरांवर ताबा मिळवून मॉस्कोच्या दिशेने कूच केले होते.
सैनिकांच्या सुरक्षेची हमी
रशियातील अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी बेलाऊसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांनी येवगेनी प्रिगोझीन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्याशी केलेल्या चर्चेनंतरच प्रिगोझीन यांनी मॉस्को मोहीम थांबवण्याचा निर्णय घेतला. परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. लुकाशेंको यांनी प्रिगोझीन यांच्यासमोर ही मोहीम थांबवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव स्विकारताना वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांच्या सुरक्षेची हमी आणि परिस्थिती बिघडू न देण्यासाठी तोडगा काढल्याचे लुकाशेंको यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. युव्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढत असलेल्या वॅगनर ग्रुपची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. विशेषत: युव्रेनच्या पूर्वेकडील बखमुत शहरात त्यांनी केलेली कारवाई लक्षवेधी ठरली होती.
देश पुतीन यांच्या पाठीशी : परराष्ट्र मंत्रालय
लष्करी बंड करण्याच्या प्रयत्नांना देशाचे नागरिक नाकारतात, संपूर्ण देश हा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या पाठीशी आहे, असे वक्तव्य रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून वॅगनर समूहाच्या बंड प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. षड्यंत्रकर्त्यांना देशाला अस्थिर करायचे आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षित होण्याच्या रशियाच्या प्रयत्नांना सुऊंग लावला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.









