रेल्वे अन् रस्ते भुयारी मार्गाचा प्रस्ताव : 6 हजार कोटीचा खर्च
वृत्तसंस्था /गुवाहाटी
भारत सरकारने ब्रह्मपुत्रा नदीखाली सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण भुयारांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. नुमालीगढपासून गोहपूरदरम्यान अंडरवॉटर टनेलमुळे चीन सीमेपर्यंत पोहोचण्यास सैन्याला मोठी सुलभता प्राप्त होणार आहे. 35 किलोमीटर लांबीच्या अंडरवॉटर टनेल कॉरिडॉरचा विस्तृत प्रकल्प अहवाल लवकरच तयार केला जाणार आहे. सध्या नुमालीगढहून गोहपूरदरम्यानचे अंतर सुमारे 220 किलोमीटर इतके आहे. हे अंतर कापण्यासाठी 6 तासांचा कालावधी लागतो. हे भुयारी मार्ग निर्माण झाल्यावर हे अंतर कमी होत 33 किलोमीटरवर येणार आहे. केवळ अर्ध्या तासात हा प्रवास पूर्ण होणार आहे. ब्रह्मपुत्रा भुयारीमार्ग प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्ग-37 वरील वाहतुकीचा भारही कमी होणार आहे. रेल्वे आणि रस्तेमार्गासाठी 6 हजार कोटी रुपये खर्चुन वेगवेगळे भुयारीमार्ग तयार केले जाणार आहे. याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंजुरी दिल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी दिली आहे. हा प्रकल्प पर्यावरणाला नुकसान न पोहोचविता विकासात योगदान देणार आहे. डीपीआरसाठी तांत्रिक निविदा 4 जुलै रोजी खुली केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
भुयारीमार्गांचे स्वरुप
सध्या ब्रह्मपुत्रेच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत वाहतूक कोलिया भोमोरा पूलावरून केली जाते. हा पूल प्रस्तावित भुयारीमार्गांपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. भुयाराचा सर्वात वरचा हिस्सा ब्रह्मपुत्रेपासून सुमारे 32 मीटर खाली असणार आहे. नॅशनल हायवे अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तज्ञ सल्लागारांद्वारे (लुई बर्जर) भुयारीमार्गांसाठीचे अध्ययन पूर्ण करविले आहे.
राष्ट्रीय महत्त्व
प्रकल्प पूर्ण झाल्यावर काझीरंगा नॅशनल पार्क आणि व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेस असलेल्या एनएच-37 वरील दबाव कमी होणार आहे. या भुयारीमार्गांद्वारे सैन्याला चीनला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशापर्यंत पोहोचणे सुलभ ठरणार आहे. यामुळे हा प्रकल्प राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही महत्त्वाचा आहे.









