वृत्तसंस्था /रोहतक
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आणि योगेश्वर दत्त यांच्यातील वाक्युद्ध पेटले आहे. विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने फेसबुक लाइव्हद्वारे आरोप केल्यावर योगेश्वरने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. संबंधित कुस्तीपटू खोटं बोलत असल्याचा आरोप योगेश्वरने केला आहे. संबंधित कुस्तीपटू हे स्वत:लाच सर्वात मोठे मानतात, ते चांगले कुस्तीपटू आहेत हे सत्य आहे, परंतु आता ते खोटं बोलत आहेत. बजरंगने माझ्यावर क्रीडास्पर्धांविषयी केलेल आरोप चुकीचा आहे. आम्ही हिंदू असून गायीला मानतो, कुठल्याही मंदिर किंवा गोशाळेत जाऊन बजरंगने गायीला हात लावून माझ्यावर केलेला आरोप खरा असल्याची शपथ घ्यावी असे आव्हान योगेश्वरने दिले आहे.
2016 ऑलिम्पिकनंतर मी कुस्तीमधून संन्यास घेतला होता. 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मी चाचणीशिवाय सहभागी झालो होतो आणि त्यावळी बजरंग देखील सोबत होता. 2004 पासून 2016 दरम्यान भारतात मी केवळ एकह कुस्तीत पराभूत झालो असून तो देखील जखमी झालो होते म्हणून. माझ्यावर विदेशात शस्त्रक्रिया झाली होती आणि 6 महिन्यांनी परतलो होतो असा दावा योगेश्वरने केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केला होता, राजकारणात उतरणार असल्याने नोकरी सोडली होती. निवडणुकीदरम्यान साक्षी मलिक मदतीसाठी आली होती. तसेच कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा दावा यापूर्वी कधीच माझ्यासमोर केला नव्हता असे योगेश्वरने म्हटले आहे. एखाद्या पदाचे आमिष दाखविण्यात आल्याने योगेश्वर दत्तने बृजभूषण सिंह यांची बाजू घेतल्याचा आरोप विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाने केला होता.









